खासदार सचिन ने घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

नवी दिल्ली-मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आज सकाळी राज्यसभेच्या खासदारपदाची शपथ ग्रहण केली. यावेळी त्याच्याबरोबर पत्नी अंजली हीही उपस्थित होती. सचिनने हिंदी भाषेतून शपथ घेतली.

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सचिन, अभिनेत्री रेखा तसेच उद्योगपती अनु आगा यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून शिफारस केली होती. रेखा व अनु आगा यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली होती. मात्र त्यावेळी सचिन आयपीएल सामने खेळत असल्याने त्यावेळी तो शपथ घेऊ शकला नव्हता. त्यामुळे आज राष्ट्रपतींच्या परवानगीने त्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्या चेंबरमध्ये शपथ ग्रहण केली. यावेळी त्याच्याबरोबर संसदीय कामकाज मंत्री राजीव शुल्का हेही उपस्थित होते.राजीव शुल्का आयपीएल स्पर्धांचे अध्यक्षही आहेत.

राज्य सभेचे सदस्यत्व घेणारा सचिन हा पहिला क्रिकेटपटू आहे. शपथ घेतल्यानंतर सचिनने क्रिकेटमधील कामगिरीबद्दल हा बहुमान आपल्याला दिला गेला असल्याचे सांगून इतक्यात क्रिकेटमधून निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचेही स्पष्ट केले. राज्यसभा सदस्यत्वाची नवी जबाबदारी सांभाळताना सर्वच खेळांसाठी जे कांही करणे शक्य आहे त्यासाठी प्रयत्न करेन असेही सांगितले.

Leave a Comment