कॉंग्रेसचे आकलन

सध्या देशाचे भवितव्य कॉंग्रेसच्या हातात आहे आणि कॉंग्रेस पक्षाला म्हणजेज कॉंग्रेस प्रणित संपुआघाडीला  निर्णय लकवा झालेला आहे. कोणताही निर्णय घेताना या  सरकारचे नेते गोंधळात पडलेले दिसतात. तेव्हा कसलाही निर्णय न घेता जे काही चालले आहे ते जसे चालले आहे तसे चालू द्यावे असे या सरकारचे धोरण आहे. आपोआप चालेल तसे चालू द्यावे आणि जे जे होईल ते ते पाहावे एवढेच या सरकारचे धोरण आहे, पक्षाचा कारभार नीट चाललेला नाही हे तर सोनिया गांधी यांच्यासह सर्वांना मान्य आहे. पण तो नीट न चालण्याचे कारण काय याबाबत  पक्षात एकमत नाही. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या मते आपले  मित्र पक्ष हा आपल्या वाटचालीतला मोठा अडथळा आहे. मग पक्षाचे आणि देशाचे कल्याण व्हायचे असेल तर या पक्षांना आपल्या आघाडीतून दूर केले पाहिजे. ठाकरे यांनी तर आपला खरा शत्रू राष्ट्रवादीच आहे असे म्हटले आहे. आता हे खरे असेल तर राष्ट्रवादीला आघाडीतून वगळले पाहिजे आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादीशी असलेली मैत्री तोडून  शिवसेनेशी युती केली पाहिजे. पण पक्षश्रेष्ठी काही तसे करत नाहीत. याचा अर्थ आपल्या शत्रूला सोबत घेऊन कारभार चालला आहे.

राहुल गांधी यांनीही मागे एकदा बोलताना मित्र पक्षांवरच खापर फोडले होते. पण कारभार बिघडवण्यास कारणीभूत असलेल्या या पक्षांना सोबत घेऊनच कारभार चालला आहे आणि तो वाईट असल्याचे माहीत असूनही ती आघाडी आणि कारभार दोन्हीही तसेच जारी आहे. कारण पक्ष आणि सरकार मध्ये नवा निर्णय घेण्याचीच क्षमता नाही. अशा या पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीचे अधिवेशन काल दिल्लीत पार पडले. या कार्यकारिणीत पक्षाच्या सर्वात वरच्या स्तरानंतरच्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे पक्षाबद्दल जनतेला काय वाटते आणि पक्षाची लोकप्रियता टिकविण्यासाठी कोणती धोरणे आखली पाहिजेत याचे मार्गदर्शन या अधिवेशनात होऊ शकते. या कार्यकारिणीचे सदस्य हे तळागाळातले नाहीत पण तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी त्यांचा थोडाबहुत संबंध आहे आणि जनता काय विचार करत आहे याबाबतीत त्यांना थोडा अनुभव आणि माहिती आहे. त्यामुळे पक्ष नेमका कोठे चाललेला आहे आणि त्याला पुन्हा निवडून यायचे असेल तर काय केले पाहिजे, याबाबत काही थेट सूचना या सदस्यांकडून करण्यात आल्या.

या लोकांनी केंद्रीय नेत्यांना पक्षाच्या स्थितीबद्दल बरेच काही परखडपणे सुनावलेही आहे. या कार्यकर्त्यांच्या मते पक्षाची बरीच पिछेहाट होत आहे. त्यांनी या पिछेहाटीचे सत्य पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर निर्भिडपणे मांडले. पक्षाचा कारभार काही ठिक चाललेला नाही आणि जनता सरकारच्या धोरणांवर नाराज आहे. विशेषत: पेट्रोलच्या दरावरून जनतेच्या मनात सरकारविषयी मोठा रोष आहे आणि हा रोष कमी न केल्यास त्याची किंमत पक्षाला चुकवावी लागेल याची जाणीव या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांनी पेट्रोलच्या दरावर सरकारचे नियंत्रण असावे, असे मत मांडले. सरकारने तर पेट्रोलच्या किंमती नियंत्रण मुक्त करण्याचे धोरण जाणीवपूर्वक स्वीकारलेले आहे. परंतु सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे, असे या दुसर्‍या फळीतल्या नेते कम् कार्यकर्त्यांचे मत आहे. विशेषत: पक्षाची प्रतिमा बिघडत चाललेली आहे आणि ती पक्षाच्या मंत्र्यांमुळे अधिक बिघडत आहे असे या कार्यकर्त्यांनी या पक्षश्रेष्ठींना बजावले आहे. अर्थात या बजावण्याचा श्रेष्ठींवर काय परिणाम होतो हे काही आताच स्पष्ट होणार नाही. किंबहुना या कार्यकर्त्यांनी बजावले म्हणून पक्षश्रेष्ठी मंत्र्यांना काही मार्गदर्शक सूचना करणार आहेत असेही काही संभवत नाही. कारण मंत्र्यांचे चढेल वागणे, अकार्यक्षमता आणि उंची राहणी या गोष्टी आता केवळ कॉंग्रेसचे नव्हे तर सर्वच पक्षांच्या अंगवळणी पडल्या आहेत.

कॉंग्रेस पक्षातला सर्वात मोठा दोष म्हणजे कार्यकर्ते आणि नेते यांच्यातला तुटत चाललेला संवाद. दुसर्‍या फळीतील नेते आणि कार्यकर्ते यांच्यात तर संवादाची दरी आहेच, पण दुसर्‍या फळीतले नेते आणि पक्षश्रेष्ठी यांच्यातला सुद्धा संवाद तुटलेला आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते अतीशय नाराज असतात आणि कोणाच्या प्रेरणेने पक्षाचे काम करावे, असा प्रश्‍न त्यांना पडलेला असतो. या कार्यकर्त्यांनी एक गोष्ट मात्र चांगलीच हेरलेली आहे ती म्हणजे मंत्र्यांचा भ्रष्टाचार. महालेखा-पाल या यंत्रणेमुळे पक्षातला भ्रष्टाचार उघड होतो म्हणून या कार्यकर्त्यांनी या यंत्रणेवर बरीच आगपाखड केली. मात्र त्यांनी आगपाखड केली म्हणून ही यंत्रणा रद्द होणार नाही. कारण ती घटनेने निर्माण केलेली यंत्रणा आहे. ही यंत्रणा कॉंग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांना डाचत असली तरी ती अस्तित्वात राहणारच आहे आणि तिचा कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारावर मोठा अंकुश आहे. ही वस्तुस्थिती आहे. कॉंग्रेसचे अशा पातळीवरचे कार्यकर्ते एकत्रित आले की पक्षातली, आघाडी बाबतची संभ्रमावस्था नेहमीच प्रकट होत असते. तीही या अधिवेशनात प्रकटपणे व्यक्त झाली.

Leave a Comment