किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सात राज्यांमध्ये

पुणे – किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आता राज्याबाहेर पोहोचला असून ७ राज्यातील विविध २५ शहरांमध्ये हा चित्रपट महोत्सव होणार आहे. सेंच्युरी एशिया आणि पगमार्कसच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित केला असून पर्यावरण, ऊर्जा, हवा, वन्यजीवन आणि पाणी या संदर्भातील प्रश्‍नांचा परामर्श या महोत्सवाच्या माध्यमातून घेतला जाणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ६ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दीड लाखाहून अधिक वसुंधरा प्रेमींनी हजेरी लावली असून, या फिल्म फेस्टिव्हलच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यातील विविध ३५ शहरातून महोत्सवाचे आमंत्रण मिळाले होते. त्यापैकी प्रमुख २५ शहरांमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. याची सुरूवात पहिल्यांदा सोलापूर येथे १२ ते १५ जुलैपासून होणार असून प्रत्येक शहरात हा महोत्सव चार दिवस चालणार आहे. या महोत्सवामध्ये १५ देशातील ४० चित्रपट-लघुपट दाखविण्यात येणार आहेत. त्यामध्ये भारत, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, आस्ट्रेलिया, किंबर्लो बेट, गॅलोपागोस, इंग्लंड, अमेरिका, मालदीव अशा अनेक देशातील सर्वोत्कृष्ट लघुपटांचे सादरीकरण करण्यात येईल.

गेल्या सहा वर्षातील किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवात गाजलेल्या फिल्म्सपैकी तरुण दिग्दर्शकाच्या फिल्मस्ला व्यासपीठ मिळवून देणे आणि त्यांना अधिकाधिक वसुंधरा प्रेमीपर्यंत पाहोचविणे या उद्देशाने लवकरच १० उत्कृष्ट फिल्मसचा समावेश असलेल्या वसुधंरा फिल्म अल्बम प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती चित्राव यांनी दिली.

Leave a Comment