उत्पादन शुल्क विभागाला व्यसनमुक्ती अभियानासाठी हवा ब्रॅन्ड ऍम्बेसेडॉर

मुंबई, दि. ५ – उत्पादन शुल्क विभागाला खरे तर दारूच्या दुकानाचे परवाने वितरित करणे  आणि त्यातून मिळणारा कर गोळा करणे हेच काम असते. मात्र या विभागाला एकूण उत्पादनाच्या तीन टक्के रक्कम व्यसनमुक्ती मोहिमेसाठी खर्च करावयाची असा संकेत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ही रक्कम खर्च करण्यात येते. मंत्रालयातील इतर विभागांच्या तुलनेत मोठी आर्थिक तरतूद असलेल्या या विभागाने आता व्यसनमुक्ती मोहीम राबविण्यासाठी ब्रॅन्ड ऍम्बॅसेडॉरसाठी शोध सुरू केला आहे. व्यसनमुक्तीचे महत्व जनतेवर ठसविण्यासाठी तळागाळात पोहोचण्यासाठी नामवंत कलाकारांना घेऊन एक चित्रफित तयार करण्यात येणार आहे.

व्यसनाधीनतेला बळी पडलेल्या युवा पिढीला यातून सोडविण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आता कंबर कसली आहे. चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी दारूच्या व्यसनाचे दुष्परिणाम सांगण्यासाठी तरूणांचा आवडता एखादा नट पडद्यावर येणार आहे तर त्यानंतर नामवंत कलाकार चित्रफितीद्वारे व्यसनाचे दुष्परिणाम सांगणार आहेत. आतापर्यंत जरी ब्रॅन्ड ऍम्बेसेडॉर कोण असणार आहे, हे नक्की झालेले नाही. तसेच चित्रपटाच्या कथेचाही शोध सुरू असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. सुमारे ५० कोटी रूपयांपर्यंत या चित्रफितीवर खर्च करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी महानेता अमिताभ बच्चन यांना महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी या विभागाचा ब्रॅन्ड ऍम्बेसेडॉर होण्यासंबंधी पत्र पाठविले होते. त्यासाठी आपण तयार असल्याचे अमिताभने ट्विटरवरून जाहीर केले होते. मात्र कॉंग्रेसमध्ये यावरून अंतर्गत वाद निर्माण झाले आहेत. आमदार चरणजीसिंग सप्रा यांनी अमिताभ बच्चन हे भाजपाशासित गुजरातचे ब्रॅन्ड ऍम्बेसेडॉर असल्याने त्यांना महाराष्ट्राचे ब्रॅन्ड ऍम्बेसेडॉर म्हणून बोलाविणे चुकीचे आहे, असा पवित्रा घेतला आहे. हा वाद चिघळण्याचीच चिन्हे अधिक दिसत आहेत.

Leave a Comment