अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी आर्थिक मदतीची गरज – सी.आय.आय.

नुकत्याच जाहीर झालेल्या चौथ्या तिमाहीतील एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या ५.३ टक्के विकासाने सरकारची झोप उडवली आहे. जीडीपीचा दर गेल्या ९ वर्षात सर्वात कमी ठरला असून, अर्थव्यवस्थेला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणी भारतीय औद्योगिक संघटनेने (सी.आय.आय.) ने केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट होत चालली आहे. अनेक महत्वाच्या धोरणांची अंमलबजावणी रखडल्यामुळे विकासाला खीळ बसली आहे. सध्याची परिस्थिती २००८ च्या आर्थिक मंदीपेक्षा भयानक आहे. त्यामुळे सरकारने याबाबत उपाययोजना हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे ‘सी.आय.आय.‘चे अध्यक्ष आदी गोदरेज यांनी म्हटले आहे. विकासाची खुंटलेली गती ही सरकारसाठी वेळीच सावध होण्याचा इशारा असल्याचे गोदरेज यांनी सांगितले.