अण्णा-बाबांचा एल्गार

योगगुरु रामदेवबाबा आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी रविवारी  एकत्रित येऊन दिल्लीच्या संसद मार्गावर एकदिवसीय जाहीर उपोषण केले. या उपोषणाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रामदेवबाबा आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील अनेक नेते या जाहीर उपोषणाच्या व्यासपीठावरून दिवसभर भाषणे केली आणि लोकांना खिळवून ठेवले. रामदेवबाबा आणि अण्णा असे एकत्र आले असले तरी त्यांच्यामध्ये कितपत मनोमीलन झाले आहे याबाबत शंका यावी असे एकंदर वातावरण होते. अण्णा आणि रामदेवबाबा यांनी हातात हात घेऊन ते उंचावले आणि आपण दोघेही एकच आहोत, याची ग्वाही देण्याचा प्रयत्न केला. मात्र हातात हात घेतलेल्या नेत्यांची मने जुळलेली असतातच याची काही खात्री देता येत नसते. अण्णा आणि बाबांचे तसेच झालेले आहे. या दोघांची मने जुळलेली नाहीत हे याच ठिकाणी अनेकवार दिसून आले. दोघांनी एकत्र सभा घेतली असली तरी दोघांची आंदोलने मात्र वेगळी आहेत.

रामदेवबाबांचे खेड्यापाड्यांपर्यंत पोचणारे आंदोलन आज सुरू होत आहे. ते आंदोलन गावागावांपर्यंत नेऊन तिथे ते उभे करणे आणि चालवणे यासाठी रामदेवबाबांच्याकडे कोणती संघटनात्मक ताकद आहे याचा काही उलगडा होऊ शकलेला नाही. किंबहुना अशी संघटनात्मक यंत्रणा रामदेवबाबांकडे अजिबात उपलब्ध नाही. त्यामुळे दिल्लीतल्या सभेतला एल्गार सार्‍या भारतातल्या खेड्यांपर्यंत कसा पोचणार आहे याचा कसलाही खुलासा रामदेवबाबांनी केलेला नाही. अण्णा हजारे यांची भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समिती ही संघटना आहे पण तिच्याही शाखा महाराष्ट्राच्या बाहेर फारशा नाहीत. रामदेवबाबांची संघटना तर त्यापेक्षाही कमकुवत आहे. त्यामुळे रामदेवबाबांनी घोषित केलेला आंदोलनाचा कार्यक्रम हा कागदावरच राहण्याची शक्यता आहे. अण्णा आणि रामदेवबाबा यांनी आंदोलनाची घोषणा करतानाच वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या आहेत. अण्णा हजारे यांचे आंदोलन ९ ऑगस्टला सुरू होणार आहे. रामदेवबाबांचे आंदोलन ४ जूनला सुरू झाले तर ते ९ ऑगस्टपर्यंत बरेच क्षीणही झालेले असेल आणि तिथून अण्णांचे आंदोलन सुरू होईल.

एकंदरीत भारतातल्या भ्रष्टाचाराच्या आणि काळ्या पैशाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आवाज उठवणार्‍या या दोन नेत्यांनी हातात हात घेतले असले तरी त्यांची तोंडे मात्र वेगवेगळ्या दिशांना आहेत. त्यामुळे त्यांच्या मनोमीलनाचा भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला कसलाही फायदा होणार नाही. एकटे अण्णा हजारे भ्रष्टाचाराच्या विरोधात स्वतःच्या ताकदीनुसार जे काही करत असतात त्याचा काही ना काही प्रभाव प्रशासनावर आणि समाजावर पडत असतो. एवढेच नव्हे तर अण्णांच्या आंदोलनाचे काही फलित सुद्धा ठळकपणे दिसत असते. ते अपेक्षेच्या मानाने कमी असेल, म्हणावे तेवढे प्रभावी नसेल, ते आंदोलन चालविण्याच्या अण्णांच्या पद्धतीविषयी काही लोकांची प्रतिकूल मते असतीलही. पण भ्रष्टाचार निर्मूलनाच्या इतिहासामध्ये अण्णा हजारे काही ना काही करत आहेत हे अमान्य करून चालणार नाही. त्यांना रामदेवबाबांची केवळ हातात हात घालून नव्हे तर हृदयापासून साथ मिळाली असती तर हे आंदोलन अधिक व्यापक, अधिक परिणामकारक आणि अधिक फलदायी झाले असते. परंतु या दोघांच्या विचारामध्ये आणि कार्यपद्धतीमध्ये बराच फरक असल्यामुळे ते दोघे एकत्र येऊन आंदोलन करत नाहीत आणि करू शकत नाहीत. भारतातल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. भ्रष्टाचाराच्याविरोधात खाजगीत बोलणारे लोक खूप आहेत. क्वचित लिहिणारे लोकही बरेच आहेत, परंतु अण्णा आणि रामदेवबाबा धाडसाने खुल्या व्यासपीठावर भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवतात तसा आवाज उठवणारे लोक कमी आहेत. त्यांनी एकत्र येऊन लढा दिला तर सरकारवर जनतेचा मोठा दबाव येऊ शकतो.

परंतु रामदेवबाबा असोत की अण्णा हजारे असोत ते कितीही मोठे असले तरी ते आत्मकेंद्रित आहेत. त्यामुळे ते एकत्र येऊ शकत नाहीत. काल दिल्लीमध्ये दोघांनीही एवढे शक्तिप्रदर्शन केले. परंतु अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल आणि रामदेवबाबा यांच्यातील मतभेद उघड झालेच. आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करताना कोणाचीही नावे घ्यायची नाहीत असे बाबांनी ठरवले आहे. ते त्यांनी तसे का ठरवले आणि अण्णा, अरविंद केजरीवाल इत्यादींना त्याची कल्पना दिली आहे की नाही हे काही कळत नाही. परंतु अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केलेल्या आपल्या भाषणामध्ये ए. राजा, सुरेश कलमाडी आणि लालूप्रसाद यादव यांची नावे घेतली. त्यामुळे रामदेवबाबा नाराज झाले. अरविद केजरीवाल सभा सोडून निघून गेले. भ्रष्टाचाराच्या विरोधात एकत्रीकरण करून शक्तीप्रदर्शन करण्यासाठी ही सभा आयोजित केलेली होती. परंतु तिच्यात एकत्रीकरणाच्या ऐवजी बेदिलीचेच दर्शन घडले. अशा गोष्टी सुद्धा आंदोलनाची धार कमी करणार्‍या असतात. मात्र एवढ्या तपशीलात विचार केला जात नाही. म्हणून बाबा आणि अण्णांच्या आंदोलनाचे म्हणावे तसे फलित दिसत नाही.

Leave a Comment