
माणूस हा या सृष्टीतला सर्वात प्रगत प्राणी आहे, असे समजले जाते. पण ही समजूत माणसानेच निर्माण केली आहे आणि माणूसच ती वाढवत असतो. त्याची ही समजूत खरी आहे का खोटी आहे हे त्याने तपासून पाहिलेले नाही किवा या सृष्टीतल्या अन्य प्राण्यांना या प्रगत मानवापासून काही फायदा होतो का आणि तो प्रगत असल्याचे या अन्य प्राण्यांना मान्य आहे का, हे कोणी त्या अप्रगत प्राण्यांना विचारलेले नाही. वास्तविक पाहता या पृथ्वीतलावर किंवा सृष्टीमध्ये एकटा मनुष्यप्राणी रहात नाही. इतरही अनेक प्राणी आहेत. परंतु माणूस हा इतका आत्मकेंद्रित आणि स्वार्थी प्राणी आहे की, तो ही सारी सृष्टी आपल्यासाठीच असल्याचे समजून वागत आहे. माणसाने अन्य कोणत्याही प्राण्याच्या प्रगतीसाठी कधी प्रयत्न केलेले नाही. उलट त्या प्राण्यांचा आपल्या स्वार्थासाठी आणि आपल्या चैनीसाठी कसा वापर करता येईल याचाच तेवढा प्रयत्न केलेला आहे. या मानव प्राण्याने अन्य प्राण्यांनाच नव्हे तर सार्या सृष्टीलाच ओरबाडून आपली हौस भागवली आहे. या निसर्गाने मानवाच्या आणि इतर सर्व प्राण्यांच्या सुखसोयीसाठी आणि जगण्यासाठी जे काही दिले आहे ते सारे बेमुर्वतखोरपणे वापरण्यास सुरुवात केली आहे.