बाबा रामदेव यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट

नवी दिल्ली- भ्रष्टाचाराचे निर्मूलन आणि विदेशातील भारतीयांचा काळा पैसा देशात परत आणावा या मागणीसाठी देशव्यापी आंदोलन छेडणारे योगगुरू बाबा रामदेव यांनी सोमवारी येथे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेतली. बाबा रामदेव यांना आपला संपूर्ण पाठिंबा असेल, असे यावेळी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

योगगुरू बाबा रामदेव यांच्याशी झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांच्याविरूद्ध भाजपा प्रथमपासूनच आवाज उठवित आहे. आता बाबा रामदेव यांनी भ्रष्टाचार आणि काळा पैसा याविरूद्ध जे आंदोलन छेडले आहे त्यास आपला पक्ष संपूर्ण पाठिंबा देत आहे.

रविवारी जंतर मंतर येथे आयोजित उपोषण कार्यक्रमाच्यावेळी, भ्रष्टाचाराचे निर्मूलन आणि विदेशातील काळा पैसा परत आणण्यासाठी आपण जे आंदोलन छेडले आहे त्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य आपण मागणार आहोत, असे म्हटले होते. त्यावेळी, जनता दल (संयुक्त) नेते शरद यादव, भाजपाध्यक्ष नितीन गडकरी आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची  आपण भेट घेणार आहोत, असे बाबा रामदेव यांनी म्हटले होते. त्यानुसार , सोमवारी बाबा रामदेव यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली.

Leave a Comment