दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यंदा साकारणार हवामहल

पुणे, दि. ४ – गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे यंदाच्या गणेशोत्सवात जयपूरच्या हवामहलची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. महालातील अंतर्गत सजावटीसाठी मिरर इम्पॅक्टचा वापर करण्यात येणार आहे. गुलाबी रंगाच्या हवामहलसाठी आकर्षक विद्युत रोषणाई हे यंदाच्या सजावटीचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

भाद्रपद हा अधिक महिना असल्यामुळे यंदा गणेशोत्सव सप्टेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यात आहे. सजावटीचे संपूर्ण काम पुढील तीन महिन्यांत केले जाणार आहे. या सजावटीचे रेखाटन आणि आराखडा तयार असून सोमवारी वटपौर्णिमेचे औचित्य साधून प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात आली. हवामहल शंभर फूट लांब आणि ५२ फूट रुंद असेल. तर, त्याची उंची ८० फूट असेल, अशी माहिती सजावटीचे शिल्पकार विवेक खटावकर यांनी दिली. विवेक खटावकर आणि वैशाली खटावकर यांच्या हस्ते पूजा करून या सजावटीच्या कामाचा प्रारंभ झाला. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ज्येष्ठ शिल्पकार डी. एस. खटावकर, आमदार गिरीश बापट आणि मोहन जोशी यांच्यासह ट्रस्टचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

विवेक खटावकर म्हणाले, या महालातील अंतर्गत सजावट काचेची करण्यात येणार आहे. महालासाठी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. त्यासाठी स्पेशल लाईट इफेक्टसचा वापर केला जाणार आहे. ४० कारागिरांचा चमू सजावटीच्या कामासाठी तयार झाला आहे. हवामहलच्या रंगरंगोटीसाठी जोधपूर येथून १२ जणांचा संघ येत्या महिनाअखेरीस पुण्यामध्ये येणार आहे.