चांगली नोकरी उपलब्ध होण्यासाठी अभ्यासक्रमात बदल आवश्यक – कपिल सिब्बल

मुंबई – तंत्रनिकेतनामधील विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा लागतो. हे चित्र बदलण्यासाठी पदविका अभ्यासक्रमात कालानुरुप आणि उद्योगक्षेत्राच्या गरजेनुसार बदल करणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र- राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली (एआयसीटीई) यांनी संयुक्तपणे देशातील `तंत्रनिकेतने-उपलब्धी आणि आव्हाने’ या विषयावर राज्य तंत्रशिक्षण मंडळांची द्वितीय राष्ट्रीय परिषद येथे आयोजित केली होती.

राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या या राष्ट्रीय परिषदेत होणार्‍या चर्चेमुळे आणि विचारांच्या आदान-प्रदानामुळे पदविका अभ्यासक्रमांमध्ये योग्य ते बदल करण्यासाठी नवी दिशा मिळेल, असा विश्‍वास व्यक्त करुन सिब्बल म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानामुळे उद्योग क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. उद्योजकांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या सहयोगाने तंत्रनिकेतनांच्या अभ्यासक्रमांचा दर्जा सुधारला पाहिजे. उद्योजकांनीही पदविकाधारकांना योग्य दर्जाच्या नोकर्‍या आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. तंत्रनिकेतनांमधूनच देशाला सर्वाधिक तंत्रज्ञ आणि कुशल कामगार मिळणार आहेत. त्यामुळे तंत्रनिकेतनांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे.

चांगल्या दर्जाचे शिक्षक न मिळणे, प्रात्यक्षिकांसाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध नसणे या महत्वाच्या समस्या आहेत. यावर मात करण्याबरोबरच तंत्रनिकेतनांमध्ये इलेक्ट्रॉनिक शिक्षणासारखी आधुनिक शिक्षणपध्दती राबविली पाहिजे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय ज्ञान आयोगाने दिलेल्या विस्तार, समावेश आणि दर्जा या त्रिसूत्रीनुसारच राज्यातील उच्च तंत्रशिक्षण विभागाची वाटचाल सुरु असल्याची ग्वाही देऊन उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री टोपे म्हणाले की, शिक्षण ही विकासाची किल्ली असली तरी तंत्रनिकेतनाची नुसती संख्या वाढून उद्योजकांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार नाही. पदविका अभ्यासक्रम म्हणजे पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्याचा राजरस्ता झाला आहे. पदविकाधारकांनाच उद्योगक्षेत्रात सामावून घेतले जावे यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. या दृष्टीने ही परिषद अत्यंत महत्त्वाची आहे.

राज्यात महिला आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शुल्क माफी किंवा शुल्क परतफेड योजना कार्यान्वित आहेत. फक्त स्त्रियांसाठी तीन तंत्रनिकेतने असून पाच तंत्रनिकेतनांमध्ये महिलांसाठी वेगळे वेळापत्रक आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Comment