‘पत्री सरकार’ लवकरच रूपेरी पडद्यावर

पुणे, दि. ४ – भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलेले क्रांतीकारक आणि त्यांच्या जीवनसंघर्षाची कहानी या सर्वांची व्याप्ती एवढी मोठी आहे की, या प्रत्येक क्रांतीकारकाच्या आयुष्यावरच नव्हे, तर प्रत्येक घटनेवर एक स्वतंत्र अध्याय लिहिला जाऊ  शकतो. काहींनी आपल्या विचारांना आदर्श मानून चळवळ उभारली, तर काहींनी प्रवाहाच्या विरुध्द जात आपल्या सशस्त्र क्रांतीने ब्रिटीश साम्राज्याला खिळखिळे केले. भारतीय स्वातंत्र्यलढयातील असेच एक धगधगते पर्व म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील.

ब्रिटीश राजवटीच्या अत्याचाराखाली भारतीय समाज भरडून निघत असताना नाना पाटलांनी पश्‍चिम महाराष्ट्र आणि परिसरात ब्रिटीशांच्या कारवाया उधळून लावत त्यांची जुलमी राजवट मोडून काढली. आपल्या तुफानी सेना या सशस्त्र क्रांतीकारी संघटनेच्या माध्यमातून ब्रिटीशांबरोबरच सामान्य शेतकर्‍यांवर जुलुम करणार्‍या सावकारशाही विरुध्द लढा उभारला आणि `प्रतिसरकार’ स्थापन केलं. अतिशय रोमांचकारी आणि नाटयपूर्ण घटनांनी भरलेल्या क्रांतीसिंह नाना पाटलांची जीवनकहानी `पत्री सरकार’ चित्रपटाद्वारे मराठी रुपेरी पडदयावर अवतरणार आहे.

लेखक- दिग्दर्शक गजेंद्र अहिरे हा चित्रपट घेऊन येत आहेत. गेली दोन दशक हिंदी मनोरंजनसृष्टीत कार्यरत असणा-या `ए. एस.आर.मिडीया’ या निर्मिती संस्थेअंतर्गत तयार होणा-या या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सय्यद आसिफ जाह – शुजा अली सांभाळीत आहेत.

शेतकरी कामगारपक्षांतर्गत ग्रामीण भागातील चळवळ ही मुख्यत: नाना पाटील यांच्यामुळे शक्य झाली. ब्रिटीशांच्या अत्याचाराविरुध्द क्रांतिसिंहानी `प्रतिसरकार’ स्थापून त्याची स्वतंत्र घटना तयार केली. दुष्ट प्रवृत्तींना नानांच्या प्रतिसरकारचा चांगलाच धाक होता. गरीबांवर, बहुजन समाजावर अन्याय करणा-या समाजविघातक शक्तींना प्रतिसरकारने अक्षरश: पत्र्या ठोकल्या. त्यामुळे `प्रतिसरकार’ हे `पत्री सरकार’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

पारतंत्र्याचा काळ,  ब्रिटीशांचे अत्याचार, अशात नानांनी भूमिगत राहून घरादारावर तुळशीपत्र ठेवून लढलेला स्वातंत्र्यसमर आजच्या पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे हा विचार या चित्रपटाच्या निर्मितीस कारणीभूत ठरला असून देशाच्या स्वातंत्र्यलढयातील हे धगधगतं पर्व लवकरच रुपेरी पडदयावर अवतरणार आहे.

Leave a Comment