राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने राजीनामा द्यावा – मुख्यमंत्री पर्रीकर

पणजी, दि. ४ – गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने त्वरित राजीनामा द्यावा, जेणे करून या बँकेवर प्रशासक नेमणे सरकारला शक्य होईल, अशी प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे. या बँकेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असून बँक वाचविण्यासाठी त्या दूर करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या या वक्तव्यामुळे गोव्याच्या सहकारी बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
 
गोवा राज्य सहकारी बँक ही गोव्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील शिखर बँक आहे. सध्या या बँकेवर रामचंद्र मुळे यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळ आहे. मात्र, बँकेच्या आर्थिक स्थितीवरून गेल्या बर्‍याच काळापासून संशयाचे वातावरण आहे. स्वतः संचालक मुळे काही कारणांमुळे वादग्रस्त ठरले आहेत. या बँकेची आर्थिक घडी योग्य प्रकारे बसविण्यासाठी  सरकारच्या हस्तक्षेपाची गरज असून त्यासाठी विद्यमान संचालक मंडळाने राजीनामा देऊन बाजूला होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मात्र, बँकेच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीला सरकारी मालकीच्या कदंब वाहतुक महामंडळाने घेतलेले सुमारे ४५ कोटी रूपयांचे कर्ज जबाबदार आहे. सरकारने हे थकित कर्ज दिल्यास, बँकेची परिस्थिती सुधारू शकेल, त्यासाठी संचालक मंडळाने राजीनामा देण्याची आवश्यकता नाही, असे मुळे यांनी म्हटले आहे. परिणामी, येणार्‍या काळात, बँकेचे संचालक मंडळ आणि सरकार यांच्यात चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.

Leave a Comment