दोन महिन्यात ४८ मराठी चित्रपटांची निर्मिती : यश मात्र दोन चित्रपटांनाच

पुणे – मराठी चित्रपटसृष्टीत आशयप्रधान आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत असताना दुसरीकडे मनोरंजनाचा विनोदी तडका असलेले चित्रपटही येत आहेत. सर्वसामान्य प्रेक्षक वर्गांचा विचार करून चित्रपट बनविण्यात येत असले, तरी मागील दोन महिन्यांत तब्बल ४८ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये आशयप्रधान चित्रपटांपेक्षा विनोदी चित्रपटांची संख्या जास्त आहे.

एप्रिल, मे महिन्यात अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. बाबु बँड बाजा, काकस्पर्श, अजिंठा यासारख्या आशयप्रधान, दर्जेदार चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित `तुकाराम’ हा चित्रपटही  येत आहे. संत तुकारांच्या भूमीकेत अभिनेता जितेंद्र जोशी आहे. अभिनेत्री अलका कुबल -आठल्येची निर्मिती असलेला तृतीय पंथीयावर भाष्य करणारा ‘आम्ही का तिसरे’अशा दर्जेदार चित्रपटांच्या जोडीने विजय पाटकरचा `लावू का लाथ’, दादा कोंडके यांच्या सहकार्‍यांनी दादा स्टाईलमध्ये तयार केलेला `मला एक चानस हवा’ असे तद्दन विनोदी चित्रपटही आले आहेत. त्यापाठोपाठ आशीष उबाळे यांचा `बाबूरावला पकडा’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात भरत जाधव, मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर, सई ताम्हणकर आदी कलाकार आहेत. बँकॉक येथे याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

एप्रिल महिन्यात आयपीएल सामने सुरू असल्याने हिंदीमधील बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. याचाच फायदा घेत मराठीतील निर्मात्यांनी आपले चित्रपट प्रदर्शित केले होते. मात्र गिरिश कुलकर्णीचा मसाला, नितिन देसाईंचा अजिंठा, महेश मांजरेकरचा काकस्पर्श वगळता कोणताही मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकलेला नाही. यामध्ये गौतम जोगळेकरचा मल्टीस्टार ‘जय जय महाराष्ट्र’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी जय महाराष्ट्र केले. हिंदी मध्ये रिमेक चित्रपटांची धुम आलेली असताना मराठीत मात्र आशयप्रधान आणि विनोदी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर स्पर्धा असल्याचे दिसते.

Leave a Comment