पुणे फेस्टिव्हल समितीच्या बैठकीत कलमाडींची उपस्थिती; शहरातील राजकारणात सक्रिय

पुणे, दि. ४ – राष्ट्रकूल घोटाळा प्रकरणी तिहारवारी केलेले खासदार सुरेश कलमाडी पुन्हा एकदा पुणे शहरातील राजकारणात सक्रिय झाल्याची चिन्हे दिसत आहेत. शनिवारी पुणे फेस्टिव्हलच्या संयोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी कलमाडी यांची विशेष उपस्थिती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.

येत्या गणेशोत्सवात आयोजित करण्यात येणार्‍या पुणे फेस्टिव्हलचे नियोजन करण्याच्या निमित्ताने कलमाडी यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली. आमदार रमेश बागवे, दीप्ती चौधरी, उपमहापौर दीपक मानकर, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, प्रसन्न जगताप आदी फेस्टीव्हलच्या संयोजन समितीतील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यंदा गणेशोत्सवाच्या काळात चार दिवस पुणे फेस्टिव्हलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. पुढील वर्षी फेस्टिव्हलचा रौप्य महोत्सव आहे. त्यामुळे त्यापूर्वीचा फेस्टिव्हल जोरात साजरा करावा, असे मत सर्व पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले. दरम्यान, कलमाडी यांनी सुरू केलेल्या काही उपक्रमांना पुणे महापालिकेने यंदा बजेटमध्ये निधीची तरतूद ठेवलेली नाही, तर काही उपक्रमांची तरतूद कमी केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कलमाडी यांनी फेस्टिव्हलची तयारी आतापासूनच सुरू केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, कलमाडी यांना सीवायजी घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आली आणि त्याचवेळी त्यांना कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आले. महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांची सुटका झाली. मात्र, या काळात ते शहराच्या राजकारणात थेट सक्रिय नव्हते. तसेच महापालिकेच्या निवडणुकीतही ते जाहीरपणे सहभागी झाले नव्हते. त्यामुळे त्यांचे बैठकीतील आगमन त्यांच्या समर्थकांना दिलासा देणारे ठरले आहे.