ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांत विदेशी गुंतवणूक वाढली

मुंबई, दि. ४ – शेअर बाजारातील मंदी व प्रमुख क्षेत्रांची झालेली पिछेहाट लक्षात घेत विदेशी एफ.आय.आय. कंपनीने ऊर्जा क्षेत्रांतील भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढविली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत या क्षेत्रातील टाटा पॉवर, रिलायन्स पॉवर, आर ई सी या सारख्या कंपन्यांमध्ये एफ आय आय (फॉरेन इन्स्टिटयूशनल इन्व्हेस्टर्सने) मोठी गुंतवणूक केली आहे.

शेअर बाजारात ऊर्जा क्षेत्रातील १३ कंपन्या लिस्टेड आहेत. यातील तब्बल ११ कंपन्यामधील विदेशी गुंतवणूकीचा हिस्सा वाढला आहे. चौथ्या तिमाहीत या कंपन्यामधील पॉवर ग्रीड व अदानी पॉवर या कंपन्या वगळता ‘एफ.आय.आय.‘ ची गुंतवणूक वाढली आहे. ऊर्जा कंपन्यांना भेडसावणार्‍या कोळशाची टंचाई दूर करण्यासाठी सरकारने कडक कारवाई केली आहे. यामुळे ‘एफ आय आय‘ने कंपन्यामधील गुंतवणूकीचा ओघ वाढविला असल्याचे सी.एन.आय. टिचर्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक किशोर ओसवाल यांनी सांगितले.

ऊर्जा क्षेत्रांमध्ये केवळ विदेशी गुंतवणूकदारच नव्हे तर अनेक फंड हाऊसमधूनही मोठी गुंतवणूक केली जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सार्वजनिक क्षेत्रांतील कंपन्यामध्ये तसेच खाजगी कंपन्यामध्येही गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली आहे. यामध्ये पॉवर फायनान्स कॉपोरेशन या कंपनीतील विदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक ९.८५ टक्क्यांनी वाढली. तसेच टाटा पॉवर या कंपनीतील एफ.आय.आय. ची गुंतवणूक २१.८७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.  

Leave a Comment