संजय दत्त यांचे राजकीय भवितव्य अंधातरी

मुंबई, दि. ३ – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणारे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस संजय दत्त यांचा आगामी २७ जुलै रोजी होणार्‍या विधान परीषद निवडणुकीत कॉंग्रेसने पत्ता कट केला असल्याची चर्चा आहे.

अशोक चव्हाण यांना आदर्श प्रकरणात मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाचे तत्कालीन राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १० जनपथने थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली. मात्र, पृथ्वीराज एकाही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना सहा महिन्यात विधानसभा अथवा विधान परिषदेवर पाठवणे क्रमप्राप्त होते. मात्र, त्यांच्यासाठी दोन्ही सदनात एकही जागा रिक्त नव्हती. त्यासाठी कोणीतरी राजीनामा देणे गरजेचे होते. त्यावेळी संजय दत्त यांनी मुख्यमंत्र्यांसाठी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हा चव्हाण विधान परिषदेचे सदस्य झाले आणि त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला.

यावेळी संजय दत्त यांना चव्हाण यांच्या जागेवर राज्यसभेत पाठवण्याचे घाटत असताना अल्पसंख्यांक व्यक्ती राज्यसभेवर पाठवावी असा प्रस्ताव अनिस अहमद, मुझ्झफर हुसेन या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींपुढे ठेवला आणि हुसेन दलवाई यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. आश्‍चर्याची बाब म्हणजे हुसेन दलवाई यांची विधान परिषदेची मुदत २०१६ पर्यंत असताना चव्हाण दलवाई यांच्या जागेवर निवडून येण्यापेक्षा संजय दत्त यांच्या जागेवर का निवडून आले हे एक कोडेच आहे. अद्याप दलवाई यांची जागा रिक्तच आहे.  

२७ जुलै रोजी कॉंग्रेसचे चार सदस्य विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत. मात्र, त्या चार जागांसाठी उमेदवार निश्‍चित करण्यात आल्याचे समजते. संजय दत्त यांना यावेळीही संधी देण्यात आली नसून पक्षाने त्यांना अडगळीतच टाकल्याचे दिसते.

Leave a Comment