बालकांचे कुपोषण टाळण्यासाठी राज्यशासन सुरू करणार दूध बँक

मुंबई  – मातेचे दूध हे बालकासाठी अमृत असल्याचे नेहमीच मानले गेले आहे. कित्येक नवजात बालकांना मातेचे दूध न मिळाल्याने कुपोषित व्हावे लागते. हे टाळण्यासाठी जास्तीत जास्त मिल्क बँक सुरू करण्याचा निर्णय आता राज्य शासन घेत आहे.

कुपोषणावरील श्‍वेतपत्रिकेबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांची आणि महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. या चर्चेदरम्यान कुपोषणावर मात करण्यासाठी काही उपाय सुचविण्यात आले. त्यामध्ये बालकांना मातेचे दूध मिळावे, यावर झालेल्या चर्चेत दूध बँकेची संकल्पना पुढे आली.

शुक्रजंतू, नाळ, रक्त याबरोबरच आता मातेच्या दुधाची बँक असणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सध्या संपूर्ण मुंबईत एकमेव दूध बँक सायन येथे आहे.

मातेच्या दुधाची अशी बँक असणे गरजेचे आहे. ही संकल्पना राबविण्यासाठी महिला आणि मुलींचे मतपरिवर्तन करणे गरजेचे आहे. त्यासाठी दहावीनंतर मुलींचे काउन्सिलींग करण्यात येणार आहे.

यावेळी वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमात न्युट्रीशन या विषयाचा समावेश करण्याचा ही निर्णय घेण्यात आला. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा विषय समाविष्ट करण्यात येईल. तसेच, कुपोषणावर मात करण्यासाठी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांवर जबाबदारी सोपविण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यात एकूण ४४ महाविद्यालये आहेत. पुढील वर्षापासून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे समजते.

Leave a Comment