पंतप्रधानांचे स्वागत कऱण्यास ममता बॅनर्जी गैरहजर

कोलकाता, दि. ३ – कोलकाता विद्यापीठ आणि बोस इन्स्टिट्यूट या दोन शिक्षणसंस्थांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोलकाता शहरात आलेल्या पंतप्रधानांचे शिष्टाचारानुसार विमानतळावर स्वागत करण्याचे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टाळले. प. बंगालच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक पॅकेज मिळत नसल्यामुळे बॅनर्जी यांनी पंतप्रधानांसमोर येणे टाळले असल्याची चर्चा आहे.

अवघ्या तीन तासांच्या छोटेखानी दौर्‍यावर आलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे कोलकाता विमानतळावर स्वागत कऱण्यासाठी राज्याचे वरिष्ठ मंत्री पार्थ चटर्जी, सुब्रत मुखर्जी, अमित मिश्र आणि राज्याचे मुख्य सचिव समर घोष उपस्थित होते. पंतप्रधानांनी विमानतळावरून थेट सॉल्टलेक येथील बोस इन्स्टिट्यूटच्या दिशेने कूच केले. जेथे त्यांच्या हस्ते युनीफाईड ऍकेडमिक कॅम्पसचा शिलान्यास कार्यक्रम पार पडला.

त्यानंतर कोलकाता विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय विज्ञान कॉंग्रेसच्या शताब्दी महोत्सवी समारंभाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमात मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल एम.के. नारायणन् देखील उपस्थित होते. त्यानंतर दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी ममतांशी काही मुद्यांवर चर्चा केली.

यावेळी पेट्रोलियम पदार्थांच्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या किंमती कमी कराव्यात, अशी मागणी ममतांनी पंतप्रधानांकडे केली. तसेच काही केंद्रीय मंत्रालयांकडून प.बंगाल राज्य सरकारला सहकार्य मिळत नसल्याची तक्रार ममता यांनी यावेळी केली.

राज्यातील दक्षिण चोवीस परगणा जिल्ह्यातील सागरद्वीप येथे दरवर्षी भरणार्‍या गंगासागर मेळाव्याला कुंभमेळ्याप्रमाणे राष्ट्रीय समकक्ष दर्जा देण्याची मागणीही मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी पंतप्रधान डॉ. सिंह यांच्याकडे केली.
 
शाहरूख प्रकरणी पंतप्रधानांच्या हस्तक्षेपासाठी ममता आग्रही
नुकत्याच संपलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या सामन्याच्या वेळी हिंदी चित्रपट अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खानने गैरवर्तन केले होते. परिणामी त्याला मुंबई क्रिकेट असोसिएशन्सने (एमसीए) वानखेडे स्टेडिअमवर प्रवेश कऱण्यास बंदी केली आहे.

या प्रकरणी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी मध्यस्थी करून एमसीएचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांना शाहरूखवरील ही बंदी उठविण्यास सांगावे, असा आग्रह बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना केला. शाहरूख हा बंगाल राज्याचा ब्रँड ऍम्बेसेडॉर असल्यामुळे त्याच्या छबीचा राज्याच्या छबीवर देखील परिणाम होतो, असा युक्तीवाद यावेळी ममता यांनी केला.     
 

Leave a Comment