सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी चीनची नियुक्ती

न्यूयॉर्क, दि. ३ – संयुक्त राष्ट्र संघटनेची अत्यंत महत्वाची शाखा समजल्या जाणार्‍या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षस्थान चीनकडे सोपविण्यात आले आहे. जून महिन्याकरिता ही जबाबदारी चीनकडे राहील. अझरबैझान देशाचे सुरक्षा समितीतील स्थायी प्रतिनिधी अगशिन मेहदीयेव यांच्याकडून चीनचे स्थायी प्रतिनिधी ली बाओदोंग यांनी नुकतीच अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

बाओदोंग यांनी या बहुमानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आपण ही जबाबदारी प्रामाणिकपणे आणि तटस्थ राहून निभावू, तसेच आंतरराष्ट्रीय शांतीप्रक्रिया आणखी प्रभावी बनविण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. सुरक्षा परिषदेच्या जून महिन्यातील कामकाजात ३० महत्वाच्या विषयांवर चर्चा होणे अभिप्रेत आहे. यात सिरिया. सुदान, दक्षिण सुदान तसेच मध्य-पूर्व आशियातील काही देशांशी संबंधित सुरक्षा प्रश्‍नावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

सुरक्षा परिषदेकडे जगात शांतता आणि सुरक्षा कायम राखण्याची महत्वाची जबाबदारी असते. भारत या समितीचा अस्थायी सदस्य आहे. या समितीतील सदस्य देशांच्या इंग्रजी स्पेलिंगमधील अद्याक्षरानुसार क्रमाक्रमाने प्रत्येक देशाकडे परिषदेचे अध्यक्षपद सोपविले जाते. चीनकडे यापूर्वी मार्च २०११ मध्ये परिषदेचे अध्यक्षपद होते.