विकासाच्या टक्केवारीत बिहार सरस, महाराष्ट्र मागास

नवी दिल्ली, दि. ३ – गरीब आणि मागास समजल्या जाणार्‍या ‘बिमारू’ राज्यात अग्रस्थानी असलेल्या बिहारने कात टाकली आहे. यंदा लागोपाठ दुसर्‍या वर्षी देशातील इतर सर्व राज्यांना मागे टाकत बिहारने सर्वाधिक विकासगती कायम राखली आहे. बिहारची अर्थव्यवस्था २०११-१२ या आर्थिक वर्षात १३.१ टक्के या गतीने विकसित झाली. चार वर्षांपूर्वी प्रथमच बिहारने दोन अंकी विकासगती वाढविली आणि आता सलग दोन वर्षे ती कायम राखत दिल्ली आणि पंजाब या समृद्ध प्रदेशांना देखील बिहारने मागे टाकले आहे.

विकासाच्या क्रमवारीत एकेकाळच्या मागास बिहारचा आता अग्रक्रम असून त्यापाठोपाठ अनुक्रमे दिल्ली, पुदुच्चेरी, छत्तीसगड आणि गोवा या राज्यांचा क्रम आहे. वस्तुतः विकासाच्या बाबतीत गुजरातचा सर्वाधिक बोलबाला आहे. परंतु प्रत्यक्षात पहिल्या पाचांच्या क्रमवारीत गुजरात कोठेही नाही. सांख्यिकी मंत्रालयाकडे आलेल्या ताज्या अहवालानुसार पंजाब, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांची ढोबळ घरगुती उत्पादकता अर्थात जीडीपी टक्केवारी २०११-१२ या वर्षात राष्ट्रीय सरासरी (६.५ टक्के) पेक्षा देखील कमी आहे. मात्र, गुजरात आणि तामिळनाडू यासाख्या मोठ्या राज्यांचा विकास अधिक व्यापक आहे आणि त्यांच्यापैकी कोणीही कधीही ‘नंबर वन’ बनू शकतो, असा तज्ज्ञांचा होरा आहे. बिहार आणि छत्तीसगड या राज्यांची टक्केवारी चांगली असली तरी त्यांचा विकास व्यापक नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.

याचाच दुसरा अर्थ असा की, २००४-०५ या आर्थिक वर्षातील किंमती पायाभूत (आधार) धरल्या तर तामिळनाडूतील आर्थिक उलाढाल ४.२८ कोटी रूपयांची ठरते. तर बिहारची ढोबळ उत्पादकता जीडीपी केवळ १.६३ कोटी रूपयांचीच असल्याचे दिसते. याआधी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि आता तामीळनाडूची अर्थव्यवस्था उत्तर प्रदेशसाख्या अवाढव्य राज्यापेक्षाही मोठी आहे. नव्या अहवालात महाराष्ट्राची आकडेवारी उपलब्ध नाही, पण उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था ४.१९ लाख कोटी रूपयांची आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अगर वार्षिक योजना आजही देशात सर्वात मोठी असावी असा अंदाज आहे. कारण मागील २०१०-११ या वर्षाची त्याची योजना ७ लाख कोटी रूपयांची होती. अलिकडच्या काही वर्षात गुंतवणूकदारांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरवत गुजरात आणि तामीळनाडूला प्राधान्य दिल्याने महाराष्ट्राच्या विकासाची गती सुस्तावली आहे. उलटपक्षी बिहारच्या विकासाची गती वाढण्याचे प्रमुख कारण तेथील सुधारलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, दळणवळणाची वाढती साधने अर्थात रस्ते बांधणी आणि अन्य बांधकाम क्षेत्राची वाढ असल्याचे सांगण्यात येते. अधिक धान्य उत्पादनाचाही विकासाच्या गतीवर परिणाम झाला आहे.

Leave a Comment