लंडनची राणी दुसरी एलिझाबेथ हिला सिंहासनाधिष्ठीत होऊन साठ वर्षे झाल्याच्या निमित्ताने ब्रिटनचे वैभव म्हणून ओळखले जाणारे बिग बेन अथवा पार्लमेंट क्लॉक टॉवर आता एलिझाबेथ टॉवर या नांवाने ओळखला जाणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेरॉन यांनी नुकतीच ही बातमी दिली असून या टॉवरचे नाव राणीवरून ठेवले जावे यासाठी राबविल्या गेलेल्या सह्यांच्या मोहिमेत ३३१ लॉ मेकरसह पंतप्रधान कॅमेरॉन यांनीही सही केली आहे. राणीच्या राज्यारोहणाच्या हिरक महोत्सवानिमित्त आजपासून म्हणजे शनिवारपासून चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बिग बेनचे नवे नामकरण-एलिझाबेथ टॉवर
लंडनची पहिली राणी व्हिक्टोरिया हिनेही साठ वर्षे राज्य केले होते आणि १८९७ साली असाच मोठा समारंभ येथे साजरा झाला होता. त्यावेळीही हाऊस ऑफ पार्लमेंटच्या दुसर्या टोकाला असलेल्या स्क्वेअर टॉवरचे नामकरण व्हिक्टोरिया टॉवर असे करून राणीचा खास सन्मान केला गेला होता. आता बिग बेनचे नामकरण एलिझाबेथ टॉवर असे केले जात आहे. सुमारे ९६ मीटर उंचीचा हा टॉवर सर्वसामान्यपणे बिगबेन म्हणून ओळखला जातो तो या टॉवरवर असलेल्या प्रचंड घंटेवरून. या घंटेचे टोल मध्य लंडनमध्येही स्पष्टपणे ऐकू येतात. १९ व्या शतकात हा टॉवर बांधला असून त्याचे मूळ नांव आहे पार्लमेंट क्लॉक टॉवर.
या टॉवरच्या नवीन नामकरणावर जूनअखेरी होत असलेल्या बैठकीत हाऊस ऑफ कॉमन्स ही ब्रिटीश पार्लमेंटची गव्हर्निंग बॉडी शिक्कामोर्तब करणार आहे असे समजते.