राज्यात दूध भेसळविरोधी अभियान राबविणार

मुंबई, दि. १ – राज्यात १ जून ते ३० जून या कालावधीत दूध भेसळविरोधी अभियान राबविण्यात येत असून सर्व संबंधीत अधिकार्‍यांनी ते यशस्वीपणे राबवावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी येथे केले.  सर्व संबंधित अधिकार्‍यांची मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सतेज पाटील यांनी, भेसळखोरांना जरब बसविण्यासाठी धाडीसत्र आयोजित करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले.

पाटील म्हणाले की, या अभियाना दरम्यान दूध भेसळीचे दुष्परिणाम व दूध भेसळ ओळखण्याच्या सोप्या पद्धती याविषयी ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी सर्व ठिकाणी बॅनर्स लावणे; तसेच घरोघरी पत्रके वाटणे, असे उपक्रम राबविण्यात येणार असून दूरदर्शन, आकाशवाणी व वर्तमानपत्रांतून प्रबोधनासाठी जाहिरातींचा वापर करण्यात येणार आहे.

दुधातील भेसळ रोखण्याकरिता ग्राहकांनी दुधाची खरेदी प्राधिकृत व्यक्तींकडूनच करावी. दूध खरेदी करताना पिशवीचा एखादा कोपरा कापून पुन्हा सील केला आहे काय, याची खातरजमा होण्यासाठी दुधाच्या पिशवीचे सीलबंद केलेले दोन्हीकडील भाग काळजीपूर्वक तपासावेत. दुधाची खरेदी करताना पिशवीवरील बॅगचे नाव, दुधाचा प्रकार व उत्पादकाचे नाव यांसह वापर करण्याचा दिनांक तपासावा. दुधाच्या पिशवीचे तोंड नीट तिरकस कापावे व रिकाम्या पिशवीचे जास्तीत जास्त तुकडे करावेत, जेणेकरुन त्या पिशवीचा पुनर्वापर होणार नाही. आपला दूध विक्रेता किंवा दूध घरपोच करणारी व्यक्ती कोण आहे, याची खात्रीशीर माहिती प्राप्त करुन घ्यावी.

दुधातील भेसळ ओळखण्याच्या काही घरगुती सोप्या पद्धती आहेत. दुधाचा थेंब गुळगुळीत उतरत्या पृष्ठभागावर टाकल्यास पाणीमिश्रीत दूध चटकन खाली जाईल तर शुद्ध दुधाचा थेंब सावकाश खाली जाईल. याशिवाय दुधामध्ये स्टार्च किंवा पीठ टाकले असल्यास हे ओळखण्यासाठी उकळून थंड केलेल्या पाणीमिश्रित दुधात तीन ते चार थेंब टिक्चर आयोडिन टाकले असता मिश्रणास निळा रंग येतो. अशा प्रकारची खबरदारी ग्राहकांनी घ्यावी, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. दूध भेसळीविषयी काही तक्रार असल्यास संबंधित जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात किंवा निःशुल्क हेल्पलाईन क्र.१८००११२१०० वर किंवा राज्यस्तरीय ग्राहक संरक्षण निःशुल्क हेल्पलाईन क्र.१८००२२२२६२ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.

Leave a Comment