मान्सूनचे आगमन लांबणीवर २ जूननंतर केरळमध्ये दाखल होणार

पुणे, दि.१ – अरबी समुद्रातील ‘अँटी-सायक्लोन’ स्थितीमुळे मान्सूनच्या वार्‍यांचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्राच्या दक्षिण किनारपट्टीकडून धडकलेल्या मान्सूनचे केरळमधील आगमन लांबणीवर पडणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तसेच येत्या काही दिवसात अंदमान-निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

नैऋत्य मोसमी वार्‍यांचा प्रवास धीम्या गतीने सुरू आहे. सध्या या वार्‍याने मध्य श्रीलंकेपर्यंतचा परिसर व्यापलेला असून मान्सूनच्या पुढील वाटचालीस हवामान अनुकूल आहे. मात्र तरी त्याचा मुक्काम अजून अंदमानातच कायम आहे. तसेच मान्सूनच्या प्रगतीसाठी अद्याप पोषक वातावरण नसल्याने पुढच्या दोन दिवसांत त्याचा मुक्काम अंदमानातून हलण्याची शक्यता नाही, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  

यामुळे मान्सून केरळमध्ये दाखल होण्यास आणखी दोन ते पाच दिवस लागण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्रात बाष्पयुक्त ढगांचे केंद्रीकरण झाले आहे. यामुळे येत्या शनिवारी नंतर अरबी समुद्रात अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाजही वेधशाळेने वर्तवला आहे.