जगभर पसरत आहेत बौद्ध धर्माचे विचार -ˆ कबीर बेदी

पुणे, दि. १ – बौद्ध धर्माचे उगमस्थान आपला देश असला, तरीही हा धर्म अनेक आशियाई देशांमध्ये विस्तारला गेला; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर पुन्हा इथे तो झपाट्याने वाढला. आता चित्रपटाच्या माध्यमातून बौद्ध विचार जगभर पोचू लागले आहेत. ही बाब उल्लेखनीय आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या सहकार्याने ‘नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमा’ (एनईटीपीएसी), देवकी फाउंडेशन आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे आयोजित ‘द इनर पाथ’ या बुद्धीस्ट फिल्म फेस्टीव्हलचे बेदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. ‘एनइटीपीएसी’च्या अध्यक्षा अरूणा वासुदेव व देवकी फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश जिंदाल उपस्थित होते. बेदी म्हणाले, ‘‘माझ्या आईमुळे मी बुद्ध विचारांकडे आकर्षित झालो. त्यामुळे या विचारांचा माझ्यावर प्रचंड पगडा आहे. बाबासाहेबांनी नागपुरमध्ये धर्मांतर केले. त्यामुळे बुद्धांचे विचार समाजाच्या खोलवर रूजण्याचा मार्ग मोकळा झाला. हॉलीवुडबरोबरच अनेक आशियायी देशांमध्ये निर्माण होणार्‍या चित्रपटांद्वारे बुद्धीस्ट विचारांचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार होत आहे.’’

वासुदेव म्हणाल्या, ‘‘बुद्धीस्ट विचारांवर आधारीत असंख्य चित्रपट जगभर तयार होऊ लागले आहेत. त्यामुळे अशा विचारांवर आधारीत असणार्‍या चित्रपटांचा महोत्सव पहिल्यांदा दिल्लीत भरविण्यात आला. त्यानंतर या महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद पाहून पुण्यामध्ये भरविण्याचे ठरविण्यात आले. आता पुण्यातही पहिल्याच दिवशी त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’

भुतानच्या ‘ट्रॅव्हलर्स अँड मॅजिशियन्स’ चित्रपटाने महोत्सवाचा प्रारंभ झाला. महोत्सवानिमित्त चित्रपट संग्रहालय परिसरातील जयकर बंगल्यात भरविण्यात आलेल्या बुद्धकालीन दुर्मिळ साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटनही बेदी यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात विविध देशांतील पुरातन बुद्धकालीन ग्रंथ, चित्रांचा समावेश आहे.

Leave a Comment