
मुंबई दि.२- देशातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने नवीन शालेय वर्षात दिले जाणारे आकाश टॅब्लेट हे संगणक यंदा उपलब्ध होण्याची शक्यता धुसर असल्याचे समजते. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत जगातील सर्वात स्वस्त आकाश टॅब्लेट विद्यार्थ्यांना देण्यात येणार होते. त्यासाठी यूकेच्या डाटाविंड या कंपनीशी करार करण्यात आला होता. डाटाविंड आणि आयआयटी राजस्थान हे परस्पर सहकार्यातून आकाश तयार करणार होते. मात्र मध्येच राजस्थान आयआयटी कडून हे काम आयआयटी मुंबईकडे सोपविले गेले आणि अद्यापी एकही आकाश संगणक तयारच झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास कांही दिवसच राहिले असताना हे संगणक तयारच नसतील तर ते यावर्षात विद्यार्थ्यांना मिळणे दुरापास्तच होणार आहे.
