अजिंठा चित्रपट

 मागील काही वर्षापासून मराठी चित्रपटांमध्ये वेगळे प्रयोग होत आहेत. मात्र, त्याचे प्रमाण अतिशय कमी आहे ही वस्तुस्थिती आहे. काही अपवाद अधूनमधून घडत असले तरी मराठी चित्रपट अजूनही विनोदी चित्रपटामध्ये हरवलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर नितिन चंद्रकांत देसाई यांचे चित्रपट आपल्याला सुखद धक्का देणारे असतात यात शंका नाही. 
    महाराष्ट्राच्या औंरंगाबाद जिल्ह्यात जगप्रसिद्ध ‘अजिंठा’ लेणी आहे. हजारो वर्षांपूर्वी अजिंठ्याच्या डोंगरात या लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत. या लेण्या मधल्या काळात दुर्लक्षित झाल्या होत्या. ब्रिटीश काळात त्या नव्याने जगासमोर आल्या. या लेण्यांशी जोडल्या गेलेल्या आठराव्या  शतकातील प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट आहे. अजिंठ्याच्या या लेण्यांची चित्र तयार करण्याची जबाबदारी सोपवलेला ब्रिटिश सैन्यातील मेजर रॉबर्ट गिल आणि त्याला इथल्या जंगलातील आदिवासींमध्ये सापडलेली पारो ही तरुणी यांच्यातील ही प्रेमकहाणी, सत्यघटना.. रानकवी ना. धों. महानोर यांनी या प्रेमकथेवर आधारित अजिंठा हे महाकाव्य लिहिलं. त्या महाकाव्यावर अधारीत हा चित्रपट आहे.
    हा मराठी चित्रपट पाहताना आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची कलाकृती पाहत आहोत, याची जाणिव प्रकर्षाने होते. भव्य सेट्स, खिळवून ठेवणारे छायाचित्रण यांच्या साहाय्याने मराठी चित्रपटाने घेतलेली ही भरारी पाहणे खूप सुखद वाटते. एखादी कलाकृती पाहताना आपण समृद्ध होत असल्याची जाणीव म्हणजे त्या कलाकृतीच्या श्रेष्ठत्वाची पावती असते. नितीन देसाईंचा ‘अजिंठा’ या निकषावर पूर्णपणे उतरतो. 
     दिग्दर्शक म्हणून एखाद्या प्रसंगाचा विचार न करता, संपूर्ण चित्रपटाचा एकत्रित विचार करण्याची गरज असते. प्रत्येक पात्राचं वागणं, बोलणं, कलाकारांकडून हवी तशी कामगिरी करून घेण्याचं कसब, प्रत्येक प्रसंगाचा स्वतंत्रपणे होणार्‍या परिणामाऐवजी संपूर्ण चित्रपटाचा एकत्रितपणे होणारा परिणाम असा व्यापक विचार करण्याची गरज असते. याची संपूर्ण जाणिव दिग्दर्शकाने शेवटपर्यंत ठेवली आहे. ना. धों. महानोर यांच्या महाकाव्याचे पटकथेत रूपांतर मंदार जोशी, नितीन देसाई आणि स्वत: महानोर यांनी केले आहे. वास्तवाला कल्पनेची जोड देऊन पटकथेची गुंफण करण्यात आली आहे. ती भट्टी बर्‍यापैकी जमली आहे. 
    अजिंठामध्ये दिग्दर्शकापेक्षाही दिसतं ते कॅमेर्‍याचं अस्तित्व. दिग्दर्शकाने आपल्या  कॅमेर्‍याचा अप्रतिम वापर केला आहे. महाकाव्यातील कवितांना कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलं आहे. फिलिप स्कॉट वॉलेसने साकारलेला चित्रकार, एक प्रेमी सुंदर झाला आहे. सोनाली कुलकर्णीच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरावी, अशी भूमिका तिला पारोच्या रूपाने मिळाली आहे. बुद्धदेवांचं काम म्हणून सुरुवातीला रॉबर्टला मदत करणारी,  नंतर हळुवारपणे रॉबर्टला तन व मन अर्पण करणारी आणि त्याच्या वियोगानं व्याकुळ होणारी पारो तिनं अप्रतिम साकारली आहे. मकरंद देशपांडे, अविनाश नारकर, मनोज कोल्हटकर आदींची कामेही पूरक. मुरली शर्माने यातला गावाचा मुखिया सुरेख पद्धतीने साकारला आहे. जगप्रसिद्ध अजिंठ्याला नव्याने जगासमोर आणतांना घडलेली कथा दिग्दर्शकाने सुरेखपणे पडद्यावर साकारली आहे. या अजिंठ्याच्या ट्रीपला एकदा जायलाच हवे. 

 
चित्रपट – अजिंठा
निर्माती – नेहा देसाई, मीना देसाई
दिग्दर्शक : नितीन देसाई 
संगीत – कौशल इनामदार
कलाकार : सोनाली कुलकर्णी, फिलिप्स स्कॉट वॉलेस, मकरंद देशपांडे, अविनाश नारकर. 

Leave a Comment