रिम’ २००० कर्मचार्‍यांना घरी बसविणार

मुंबई  ब्लॅकबेरीची निर्मिती करणारी रिसर्च इन मोशन (रिम) ही कंपनी जगभरातील आपल्या दोन हजार कर्मचार्‍यांच्या हाती नारळ देणार आहे. कंपनीमध्ये करण्यात येणार्‍या रचनात्मक बदलाअंतर्गत होणारी ही कर्मचारी कपात पुढच्या दोन आठवडयांत सुरू होईल, असा अंदाज आहे. ’रिम’चे जगभरात १६,५०० कर्मचारी आहेत. कंपनीने ही आकडेवारी गेल्या जूनमध्ये जाहीर केली होती. लवकरच ’रिम’ जागतिक स्तरावर रचनात्मक फेरबदल करण्यास सज्ज झाली असून, यामुळे जगभरात दोन हजार कर्मचारी कमी केले जाण्याची शक्यता ’ग्लोब अॅण्ड मेल’ने वर्तविली आहे. कंपनीतील सर्वच विभागांना या कपातीची झळ बसणार आहे. जागतिक स्तरावर असलेली मंदी व तीव्र स्पर्धा यामुळे कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यार्‍या कंपनीत आता ’रिम’ ची भर पडणार आहे. नुकतीच ’एचपी’ ने २७ हजार कर्मचार्‍यांना कमी करण्याची घोषणा केली होती.

Leave a Comment