पुणे – प्रसिद्धी अभावी क्षमता असूनही व्यावसायिक यश मिळविण्यास अपयशी ठरलेल्या मराठी चित्रपटांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सिनेमॅक्स या मल्टीप्लेक्सने पुढाकार घेतला आहे. नुकताच चित्रपट प्रसिद्धी संस्था माउली मोशंस आणि सिनेमॅक्स यांच्यात समन्वय करार झाला आहे. याद्वारे माउली मोशंसच्यावतीने प्रसिद्धी करण्यात येणारा प्रत्येक मराठी चित्रपट एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात मल्टीप्लेक्सच्या तब्बल ७० स्क्रीनवर झळकताना दिसणार आहे.
मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी सिनेमॅक्सचा पुढाकार
यामुळे मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धी बरोबरच त्यांच्या वितरणाचे नियोजनही एका महिन्यासाठी करण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी सिनेमॅक्स नसेल अशा शहरात पी.वी.आर, फेम, बिग सिनेमा, आयनॉक्स आदी मल्टीफ्लेक्समध्ये हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. चित्रपटाची प्रसिद्धी आणि वितरण यांच्यात सुसुत्रीपणा साधल्यास मराठी चित्रपटांना योग्य न्याय देता येईल. चित्रपटाचा वितरक कोणीही असला तरी या करारामुळे मराठी चित्रपटांना पुढील फायदे मिळणार आहेत. सर्व चित्रपटांना प्राईम टाईम मिळणे, हिंदी चित्रपटांप्रमाणे रेड कार्पेट प्रिमियरची सोय उपलब्ध होणे, प्रदर्शनाच्या आठवडाभर आधी कमीतकमी १० सिनेमॅक्सच्या स्क्रीनवर चित्रपटांचे प्रोमो दाखवणार, तसेच पोस्टर, बॅनरद्वारे जाहीर करणे इत्यादी.