घरचा आहेर

विवाह समारंभामध्ये किंवा अन्य कोणत्याही समारंभामध्ये यजमानांना आहेर केला जातो. त्यातले काही आहेर खास मानाचे असतात. उदा. बाईसाठी माहेरचा आहेर, पुरुषांसाठी सासुरवाडीचा आहेर वगैरे. परंतु सर्वाधिक मानाचा आहेर असतो तो घरचा आहेर. आता हा आहेर इतका मानाचा असला तरी त्याला आपला बदनाम करून टाकलेले आहे आणि कोणी तरी टोमणे मारले किंवा वर्मावर बोट ठेवले तर आपण त्याला घरचा आहेर म्हणायला लागलो आहोत. या लक्ष्यार्थाने सुद्धा घरचा आहेर वाईट नसतोच. परंतु आपण बरेच शब्द चुकीच्या पद्धतीने वापरून त्यांचे मूळ अर्थ गमावून बसलेलो आहोत. घरच्या आहेरामध्ये टीका असते, निर्भत्सना असते आणि दोषदिग्दर्शन असते. घरचीच माणसे आपले असे दोष दाखवतात तेव्हा खरे म्हणजे आपल्याला सुधारण्याची संधी मिळत असते. कारण कोणीतरी दोष दाखविल्या शिवाय आपल्याला आपले दोष समजतही नाहीत आणि दोष समजले नाही तर दोषांचे निवारणही होत नाही. म्हणून असा घरचा आहेर बराच असतो. मात्र आपण त्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो यावर बरेच काही अवलंबून असते.

कोणाही माणसाला आपले दोष दाखवलेले आवडत नाहीत. कारण प्रत्येक जण स्वत:ला निर्दोष समजत असतो. मग आपल्यात दोषच नाहीत अशी त्याची खात्रीच असेल तर त्याला त्याच्यात दोष दाखवलेले आवडणार कसे? तुकाराम महाराज मात्र याबाबतीत मोठा सकारात्मक विचार करतात आणि एका ओळीत सांगून जातात, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’. आपली निंदा करणारा माणूस शेजारीच रहात असला की, आपल्याला निंदेच्या निमित्ताने आपले दोष दिसून येतात आणि दोष निवारणाची वाटचाल सोपी होते. आपल्या शेजारी राहणारा आपला निंदक भले कोणत्या का भावनेने आपली निंदा करो, आपण मात्र ती सकारात्मकतेने घेतली की, आपली सुधारणा व्हायला सुरुवात होते. एकंदरीत शेजारी राहणारा निंदक आपल्या प्रगतीला पोषक ठरत असतो. मग असा एखादा निंदक आपल्या घरातच असला आणि तो वारंवार आपल्याला घरचे आहेर करायला लागला की मग तर काय, आपल्या प्रगतीला खूपच चालना मिळू शकते. असा घरचा आहेर करणारा घरातला माणूस आपली सुधारणा व्हावी म्हणून आहेर करत नसतो. त्याच्या मनातला असंतोष त्याला टीका करायला भाग पाडत असतो, पण आपण मात्र ती टीका सकारात्मकतेने घेतली पाहिजे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर केला आहे आणि पक्षात सध्या मरगळ आली असल्याचे मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे. अडवानी यांचे वय आता ८२ वर्षे आहे. त्या अर्थाने ते भारतीय जनता पार्टीचे बुजूर्ग नेते आहेत. त्यांनी अशा प्रकारचा आहेर केला तर तो पक्षाला उपयुक्तच ठरू शकतो. कोणी तरी पक्षात मरगळ पसरली आहे असे स्पष्टपणे म्हटले तरच मरगळ झटकण्याच्या कामाला वेगाने सुरूवात होऊ शकते. त्या अर्थाने अडवानी यांनी पक्षाच्या मरगळीचे निदान करून ती झटकण्याच्या कामाला वेग दिला आहे. मात्र अडवानी यांचा हा आहेर करण्यामागचा हेतू नेमका काय आहे, याबद्दल शंका येते. एखाद्या मोठ्या कुटुंबातला एखादा मुलगा बिघडत असेल आणि त्यामुळे घरातला एखादा वृद्ध माणूस त्यामुळे अस्वस्थ असेल तर तो त्या मुलाला एकट्याला गाठून चांगले वागण्याचा उपदेश करतो. तेव्हा त्या बुजूर्ग व्यक्तीच्या हेतूविषयी शंका येत नाही. आपल्या घरातला हा मुलगा सुधारला पाहिजे अशीच कळकळ त्यामागे असणार अशी खात्रीच असते. परंतु हीच बुजूर्ग व्यक्ती त्या मुलाविषयी त्याच्याशी बोलण्याऐवजी रस्त्यावर येऊन आपल्याच घरातल्या त्या मुलाची निंदा नालस्ती जाहीरपणे करायला लागतो तेव्हा मात्र त्याच्या हेतूविषयी शंका यायला लागते.

लालकृष्ण अडवानी यांनी आपला हा घरचा आहेर घरातल्या घरात केलेला नाही, तर तो जाहीरपणे केला आहे. खरे म्हणजे त्यांना पक्षातल्या मरगळीविषयी नितीन गडकरी यांच्याविषयी प्रत्यक्ष बोलता आले असते आणि तसे ते बोलले असते, तर त्यांचा हेतू पक्ष सुधारावा हाच आहे असे नि:संदिग्धपणे म्हणता आले असते. मात्र त्यांनी जाहीरपणे टीका करून आपल्या या घरच्या आहेराविषयी अनेक शंकांना वाव मिळवून दिला आहे. अडवानी हे पक्षातले नाराज नेते आहेत. त्यांनी आपल्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार करावे अशी महत्वाकांक्षा बाळगलेली आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्याविषयी आदरही आहे आणि सर्वसाधारणपणे भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते अडवानी पंतप्रधान व्हावेत या मताचे आहेत. परंतु भाजपाची सूत्रे ज्या रा.स्व. संघातून हलवली जातात त्या संघाचा मात्र अडवानींना पाठिंबा नाही. त्यामुळे अडवानी सध्या उपेक्षित राहिलेले आहेत. त्यांच्या घरच्या आहेरामागे या उपेक्षेतून निर्माण झालेले दु:ख व्यक्त होत आहे. पण नितीन गडकरी यांच्यावर अशी टीकेची बरसात करून अडवानी यांच्या पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा होईल असे काही वाटत नाही.

Leave a Comment