ओबीसी नाटक थांबवा

महाराष्ट्रातले तीन दिग्गज ओबीसी नेते आज पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे एकत्र येत आहेत. ते तीन नेते म्हणजे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मा. छगन भुजबळ, असेच आणखी एक माजी उपमुख्यमंत्री मा. गोपीनाथराव मुंडे आणि बीडचे सर्वेसर्वा समजले जाणारे विद्यमान मंत्री मा. जयदत्तराव क्षीरसागर. यातले दोन नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहेत तर मुंडे साहेब भाजपामध्ये आहेत. भुजबळ आणि मुंडे हे दोन वेगळ्या पक्षात असले तरी परस्परांचे चांगले मित्र आहेत. निदान जाहीर सभांमध्ये तरी ते तसे सांगत असतात. शेवटी हे दोघेही निष्णात राजकारणी नेते असल्यामुळे त्यांची ही मैत्री कितपत खरी आहे हे त्या दोघांनाच माहीत आहे. परंतु आपण वेगळ्या पक्षात असलो तरी परस्परांचे मित्र आहोत, असे सांगत हे दोन नेते अधूनमधून काही तरी बहाणा करून एका व्यासपीठावर येत असतात. त्यांचे स्वभाव, गुण-अवगुण काहीही असले तरी वक्तृत्व मात्र चांगले आहे. त्यामुळे असे हे मित्र एका व्यासपीठावर आले की, ते परस्परांना छान टोमणे मारून आणि वेळ पडल्यास परस्परांना बोचकारे काढून सभा गाजवत असतात.

अशा या मित्रांमध्ये आपले लातूरचे लाडके नेते विलासरावजी देशमुख हे सुद्धा कधी कधी सहभागी होतात. मुंडे-भुजबळ हे टोमणे मारण्याच्या बाबतीत जसे प्रसिद्ध आहेत तसे विलासराव देशमुख हे गुदगुल्या करण्याच्या बाबतीत आणि चिमटे घेण्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. (चिमटे, गुदगुल्या, बोचकारे, घणाघात या सार्‍या गोष्टी ही मंडळी केवळ शब्दानेच करत असतात हे या ठिकाणी मुद्दाम नोंदले पाहिजे) त्यामुळे ते असे एका व्यासपीठावर आले की, आणखी मजा येते. मा. विलासराव देशमुख आजकाल मात्र हसणे आणि हसवणे विसरायला लागले आहेत. हा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आहे की काय, याचा शोध घेतला पाहिजे. आजच्या चौंडी इथल्या जाहीर सभेत विलासराव नाहीत आणि ते अपेक्षितही नाहीत. कारण चौंडी इथली सभा म्हणजे ओबीसी नाटक आहे. या नेत्यांचे एक वैशिष्ट्य असे की, यापैकी कोणाला तरी शरद पवार यांना खिजवायचे असले की, ते एकत्र येतात. क्षीरसागर, भुजबळ हे पवारांचे चेलेच आहेत. परंतु अधूनमधून त्यांना पवारांच्या पक्षात ओबीसींची उपेक्षा होत असल्याचा साक्षात्कार होतो आणि मग त्या साक्षात्काराने अस्वस्थ झाले की ते एका व्यासपीठावर येतात आणि पवारांच्यावर अप्रत्यक्षपणे दबाव आणण्याचा प्रयत्न करतात.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजकारणामध्ये मराठाविरुद्ध ओबीसी असा एक अदृश्य संघर्ष आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत आणि असा काही संघर्ष असेल तर तो त्यांना माहीत असणारच. परंतु या कल्पित संघर्षामध्ये भुजबळ स्वत:ला ओबीसीचे प्रतिनिधी समजतात आणि आपण ओबीसीचे नेते आहोत असे भासवून काही तरी विधाने करीत असतात. प्रत्यक्षात ते ओबीसींचे नेते म्हणजे नेमके काय आहेत, हे त्यांना आणि परमेश्‍वरालाच ठाऊक. अशीच परिस्थिती मुंडे यांची सुद्धा आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसींचा नेता म्हणून आपले एक वेगळे महत्व असावे आणि ओबीसींच्या पाठिंब्याच्या जोरावर भाजपामध्ये आपले अढळ स्थान निर्माण व्हावे अशी सूप्त इच्छा त्यांच्या मनामध्ये सतत वास करत असते. मात्र गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा नेता म्हणून राजकारण गाजवले, असा एक काळ होता आणि त्या गाजवण्याचा फायदा म्हणून त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदही मिळाले होते. असे असले तरी त्यांची मुख्यमंत्री होण्याची लालसा काही दबत नाही आणि त्यांच्या राजकीय हालचालीतून ती लपतही नाही आणि तिच्या पूर्ततेसाठी ते सातत्याने ओबीसी कार्ड वटवण्याचा निरर्थक प्रयत्न करत असतात.

या सर्वांचा कॉमन शत्रू शरद पवार हे आहेत. मात्र पवारांनी सुद्धा आता या कथित ओबीसी नेत्यांच्या मर्यादा जाणलेल्या आहेत. छगन भुजबळ यांनी ओबीसी नेता म्हणून नेमके काय काम केले आहे याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या ओबीसी वर्गातील कामावर कोणी पीएच.डी. करण्याचा प्रयत्न केला तर त्या संशोधकाला पीएच.डी. मिळून जाईल पण शेवटपर्यंत त्याला भुजबळांनी ओबीसीसाठी केलेले काम औषधाला सुद्धा सापडणार नाही. हे भुजबळ महाराष्ट्रातल्या ओबीसींना सुद्धा धड संघटित करू शकत नाहीत आणि आपल्या मागे आणू शकत नाहीत. पण ते ओबीसींचे राष्ट्रीय नेते व्हायच्या मागे लागले होते. पण राष्ट्रीय नेते होणे म्हणजे तरी काय? याचे त्यांनाच आकलन झालेले नव्हते. देशामध्ये स्वत:ला ओबीसी नेता म्हणवून घेणारे निदान डझनभर तरी नेते असतील. त्या सर्वांचा नेता होण्याची महत्वाकांक्षा भुजबळ बाळगून होते आणि याचा एक भाग म्हणून त्यांनी दिल्लीत एक ओबीसी मेळावा घेतला होता. या पलीकडे त्यांनी काही केलेले नाही आणि त्या मेळाव्यानंतरही त्यांनी राष्ट्रीय पातळीवर कसलीही हालचाल केली नाही. ते नेते आहेत आणि ते ओबीसी जातीत जन्माला आलेले आहेत. या दोन गोष्टींची बेरीज केली म्हणजे कोणी ओबीसी नेता होत नसतो. ही गोष्ट केवळ भुजबळच नव्हे तर मुंडे आणि क्षीरसागर यांनीही लक्षात ठेवली पाहिजे.

स्वत:ला ओबीसी नेता म्हणवल्याने आणि विशिष्ट जातींच्या मेळाव्यांमध्ये हजर राहून भाषणे ठोकल्याने कोणी ओबीसी नेता होत नसतो. मात्र महाराष्ट्रातल्या या ओबीसी नेत्यांना या गोष्टीची समजच येत नाही. राज्यातल्या ओबीसी जनतेसह सर्वच गरीब लोकांचे प्रश्‍न अतीशय जटील आहेत, गुंतागुंतीचे आहेत आणि ते सोडविण्यासाठी फार मोठ्या प्रयत्नांची गरज आहे. असे प्रयत्न करण्याची बुद्धी सुचावी यासाठी मोठ्या प्रेरणेची गरज आहे आणि अशी प्रेरणा होण्यासाठी समाजाविषयीच्या सहानुभूतीची गरज आहे. समाजाच्या प्रश्‍नांसाठी प्रसंगी पदाचा त्याग करण्याची बुद्धी असली पाहिजे. परंतु हे नेते समाजाच्या प्रश्‍नासाठी पदे सोडण्याऐवजी समाजाच्या प्रश्‍नांचे भांडवल करून आपली पदे पक्की करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे हे नाटक आता लोकांच्याही लक्षात आलेले आहे. म्हणूनच यांच्या खुर्च्या धोक्यात आल्या की, ते ओबीसी वर्ग संकटात आल्याची आवई देतात आणि सर्वांचीच फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ओबीसीवर्ग म्हणावा तसा त्यांच्यामागे उभा रहात नाही. ही गोष्ट शरद पवारांच्या लक्षात आलेली आहे, म्हणून तेही हे नेते कितीही वेळा एका व्यासपीठावर आले तरी त्यांच्या या एका व्यासपीठावरच्या सभांना भीक घालेनासे झाले आहेत.

या ओबीसी नेत्यांना एक प्रश्‍न विचारावासा वाटतो की, त्यांनी आपल्या समाजाचे खरेच किती भले केलेले आहे. ज्या ज्या वेळी त्यांना संधी मिळते त्या त्या वेळी त्यांनी आपल्या समाजातल्या कोणा उपेक्षित नेत्याला पुढे करून ती संधी देण्याऐवजी आपली मुले, मुली, पुतणे, जावई, बायका यांनाच संधी दिलेली आहे. या नेत्यांनी निर्माण केलेल्या नेतृत्वाच्या प्रभावळीवर नजर टाकल्यास ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. उघड दिसणारी ही गोष्ट तर हे लोक नाकारणार नाहीत अशी अपेक्षा आहे आणि जनता डोळे उघडे ठेवून ही प्रभावळ पाहील तेव्हा या जनतेला सुद्धा त्यांच्या खर्‍या तळमळीचे योग्य आकलन होईल.

Leave a Comment