लष्करातला खांदेपालट

 भारताचे २५ वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल विक्रमसिंग हे आज आपल्या पदाचा कार्यभार हाती घेत आहेत. त्यांनी भारतीय लष्करात ३९ वर्षे सेवा बजावली आहे. ते लष्करातले अतिशय मुत्सद्दी आणि बुद्धीमान अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी आंतरराष्ट्रीय  मोहिमांतही सहभाग घेतला आहे. पूर्व विभागाचे प्रमुख आणि काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी दोन हात करणार्‍या १५ व्या रेजिमेंटचे प्रमुख म्हणूनही त्यांनी आपली उल्लेखनीय  सेवा बजावलेली आहे. लोक आता कदाचित विसरले असतील पण १९९९ साली झालेल्या कारगील युद्धात  सगळ्या भारतवासियांनी त्यांना दररोज टीव्हीवर पाहिलेले आहे. कारगील युद्धात घडलेल्या घटना माध्यमांना सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. आपल्या जवानांनी गाजवलेली मर्दुमकी ते देशाला सांगत असत. हे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते कारण ते तेव्हा लष्कराच्या आपॅरेशन्स विभागाचे अतिरिक्त सरसंचालक होते. या कामगिरीनंतर ते पूर्व भागाचे प्रमुख झाले आणि आता त्यांना या लष्कराचे प्रमुख करण्यात आले आहे.

   आजवरचे सर्वात वादग्रस्त  लष्कर प्रमुख म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल असे जनरल व्ही.के. सिंग हे निवृत्त झाले असून त्यांच्या जागी विक्रमसिंग हे लष्कर प्रमुख झाले आहेत. जनरल व्ही. के. सिंग यांनी जाता जाता वाद निर्माण केले. त्यामुळे माध्यमांत तसेच सर्वसामान्य माणसांत अप्रिय ठरले असले तरीही त्यांनी निर्माण केलेले वाद व्यापक होते आणि त्याचा आपल्या लष्कराला फायदा झाला आहे. त्यांच्या जन्मतारखेवरून वाद झाला. त्यांनी लष्कराच्या खरेदीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली.  आणखी एक वाद म्हणजे पंतप्रधानांना पत्र लिहीणे. त्यांनी या पत्रामध्ये आपले लष्कर म्हणावे तसे सक्षम नाही, असे म्हटले होते. केवळ हीच बाब वादग्रस्त ठरली असे नाही तर हे पत्र फुटल्याने या वादात आणखी एक वाद निर्माण झाला.  या वादांमुळे अनेक मुलभूत गोष्टींवर नव्याने चर्चा सुरू झाली. मात्र या सगळ्या प्रकारातून लष्कराची प्रतिमा बिघडली. लष्कर आणि संरक्षण खाते यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून आले. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सुद्धा असेच झाले. त्यातून लष्करी अधिकार्‍यांना असलेले खरेदीचे अधिकार आणि लष्करी साहित्याच्या खरेदीची प्रक्रिया या गोष्टींकडे संरक्षण खात्याचे लक्ष वेधले गेले. तिसरा वाद पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्राचा. या पत्रात लष्कर प्रमुखांनी आपले लष्कर सक्षम नसल्याचे म्हटले होते. हा तर आणखी गंभीर मुद्दा झाला. आपण एका बाजूला जगातले सामर्थ्यशाली लष्कर असल्याचा दावा करत आहोत आणि दुसर्‍या बाजूला आपलेच लष्कर प्रमुख आपली सेना पुरेशी सक्षम नसल्याचे म्हणत आहेत. यातली विसंगती जगासमोर आली आणि आपले लष्कर सक्षम नसल्याचे सत्य जनतेला कळले आणि जनता हादरली, अस्वस्थ झाली. अशा तीन व्यापक वादंगांच्या पार्श्वभूमीवर व्ही.के.सिंग निवृत्त झाले आणि विक्रमसिंग नवे लष्कर प्रमुख झाले. या तीन गोष्टींनी विक्रमसिंग यांच्या समोर तीन नवी आव्हाने उभी केलेली आहेत. लष्कराच्या वरच्या स्तरावरील अधिकार्‍यांमध्ये एकमत नाही, अनेक प्रकारचे मतभेद आहेत असा जनतेचा समज झाला आहे. हा समज पक्का व्हावा अशा अनेक  घटना घडलेल्या आहेत. 

   लष्कराची ही प्रतिमा बदलण्याची मोठी जबाबदारी नवे लष्कर प्रमुख जनरल विक्रमसिंग यांच्यावर येऊन पडलेली आहे आणि ही जबाबदारी मोठी आहे. आपल्या देशाचे प्रशासन नीट चालत नसेल तर लोक फार चिंता करत नाहीत. कारण प्रशासनातील बिघाड आणि गोंधळ हा काही आपल्या जीवन-मरणाचा प्रश्न नसतो. पण लष्करातला बेबनाव मात्र देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न बनलेला असतो. आपल्या लष्कराचा कारभार छान चाललेला आहे असा विश्वास लोकांना वाटला पाहिजे, तर लोक निरामय जीवन जगू शकतात. विक्रमसिंग यांनी यादृष्टीने योग्य दिशेने विचार सुद्धा केलेला आहे. आपले लष्कर जगातील एक उत्तम लष्कर आहे आणि जसे चित्र निर्माण केले जाते आहे तसा गोंधळ माजलेला नाही असे आपण सिद्ध करून देऊ, असे त्यांनी सैनिक समाचार या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.  भारतीय लष्कराच्या बळकटीकरणाची निश्चित स्वरूपाची योजनाच नाही असेही म्हटले जात आहे. जनरल व्ही.के. सिंग यांनी ही गोष्ट नजरेस आणून दिली होती. तिची दखल संरक्षण मंत्र्यांनी घेतली आणि बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये लष्कराच्या सिद्धतेची योजना समाविष्ट केली. त्याशिवाय २०१२ ते २०२७ अशा १५ वर्षांच्या  कालावधी साठी लष्कराची दूरगामी एकात्मिक योजनाही तयार केलेली आहे. अशा प्रकारच्या नियोजनाच्या कामात त्यांनी पूर्वी  चांगले काम केलेले आहे. भारताचे लष्कर सिद्ध आणि सज्ज करणे आणि त्याची विश्वासार्हता वाढवणे ही मोठीच जबाबदारी जनरल विक्रमसिंग यांच्यावर येऊन पडलेली आहे. ते ती पार पाडण्याश सक्षम आहेत.