टेलिनॉर भारतातून बाहेर पडणार नाही

नवी दिल्ली दि.१-नॉर्वेची टेलिनॉर कंपनी भारतातून बाहेर पडणार नसल्याचे संकेत गुरूवारी कंपनीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांकडून दिले गेले आहेत. आगामी स्पेक्ट्रूम लिलावात नव्या भागीदारासह आम्ही सहभागी होऊ असे या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

गेल्याच महिन्यात केंद्र सरकारने ट्रायचा स्पेक्ट्रूम दरवाढीचा प्रस्ताव स्वीकारल्यास भारताबाहेर पडू असा इशारा टेलिनॉरने दिला होता. मात्र टेलिकॉम कमिशनने टू जी स्पेक्ट्रूम चे उपलब्ध सर्व परवाने विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला आहे तसेच ट्रायचा नियोजित दरवाढीस विरोधही केला आहे ही चांगली बाब असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

दूरसंचार मंत्री ए.राजा यांनी २००८ साली केलेल्या स्पेक्ट्रूम घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाने ज्यां कंपन्यांचे परवाने रद्द केले त्यात टेलिनॉरला मोठा फटका बसला होता. त्यानंतर न्यायालयाने लिलावातून नवीन परवाने दिले जावेत असेही सांगितले होते. टेलिनॉरने त्यावरून युनिटेक या त्यांच्या भागीदार कंपनीला नुकसान केल्यासंबंधीची नोटीस बजावली होती. आता मात्र कंपनीने भारतात नवी कंपनी भागीदारीतून उभी करण्याचा निर्णय घेतला असून त्यांचे चार ते पाच कोटी ग्राहक आणि साडेसतरा हजार कर्मचारी यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही असे सांगितले आहे.