आगामी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी लढविणार

नवी दिल्ली दि.१- गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणूक गुजराथ आणि उत्तरप्रदेशातून लढविणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणूका २०१४ साली होणार आहेत मात्र त्या अलिकडे आल्या तरी मोदी लोकसभेचे उमेदवार असतीलच असेही सांगण्यात आले. राष्ट्रीय प्रसारमाध्यमे भारतीय जनता पार्टीच्या कामाच्या अंतर्गत पद्धतीबद्दल अनभिज्ञ आहेत असे सांगून हा नेता म्हणाला की मोदी म्हणजे असे जनरल आहेत, ज्यांच्याशिवाय युद्ध खेळणे अशक्यच आहे. मोदींखेरीज सध्या तरी भाजप नेतृत्त्वाला अन्य पर्याय नाही. गुजराथमधील आगामी विधानसभा निवडणूका हिवाळ्यात होत असून १८२ पैकी किमान ११० जागा मोदी जिंकतील असा विश्वास व्यक्त केला जात असून ही कामगिरी त्यांनी बजावली तर दिल्लीत मोठी जबाबदारी देण्यापासून त्यांना रोखणे अवघड होणार आहे. मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील काय याबाबत आत्ताच सांगता येणार नाही. हा निर्णय नंतर घेतला जाईल पण मोदींकडे दुर्लक्ष करून हा निर्णय नक्कीच घेतला जाणार नाही असेही या सूत्राकडून समजले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी मोदींची हिंदुत्वाची प्रतिमा अजिबात अडचणीची नाही. उलट काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर ठळक उठून दिसेल असा नेता त्यांना हवा आहे आणि मोदींची ती क्षमता नक्कीच आहे. सध्या १९७७ च्या आणीबाणीच्या काळाप्रमाणे देशात काँग्रेसविरोधी वातावरण तयार झाले आहे. मोदींकडे नेतृत्त्वाची धुरा सोपविली गेली तर भाजपला किमान ४० जादा जागा मिळविणे शक्य होणार आहे. शिवाय काँग्रेसच्या १०० जागा कमी होतील ते वेगळेच.

मुस्लीम समाजाकडून मोदींना राष्ट्रीय नेता म्हणून कधीच पाठिंबा मिळू शकणार नाही असे बोलले जात असले तरी भाजपने या बाबत आपली योजना आधीच आखली असून त्यानुसार मुख्यत्वे उत्तरप्रदेशात काँग्रेस आणि भाजप यांत सरळ सामना होणार नाही याच काळजी घेतली जाणार आहे असेही समजते. संघ परिवाराचे या आगामी निवडणूकांत सर्वाधिक प्राधान्य काँग्रेसचा पराभव यालाच राहणार आहे.

लोकसभा निवडणूकांत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरला तर जनतादलाचे नितिशकुमार, बिजू जनतादलाचे नवीन पटनायक आणि तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू हे मोदी यांना नेता म्हणून तर स्वीकारतीलच पण अडचण आल्यास त्यांना पाठिंबाही देतील असेही सांगण्यात येत आहे. संघ आणि भाजप, नेतृत्त्व निवडीचा निर्णय कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकांनंतर घेणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment