अॅपलच्या आयटिव्हीच्या चाचण्या सुरू?

बिजिंग दि.१- अॅपलच्या बहुचर्चित आयटिव्हीच्या चाचण्या गुप्तपणे चीनमध्ये घेतल्या जात असून नाताळपूर्वी हा टिव्ही बाजारात आणला जाईल असे समजते. चीनच्या फॉक्सकॉन शेंझेन कंपनीला या टिव्हीच्या उत्पादनाची पहिली ऑर्डर दिली गेली असून त्यांनी ट्रायल बेसिसवर प्राथमिक मॉडेल तयार केले असल्याचेही वृत्त आहे. याच महिन्यात या कंपनीला अॅपल टिव्ही बाबत विचारले गेले होते तेव्हा त्यांनी अॅपलसाठी टिव्ही बनवत असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला होता.

अॅपलचा ब्रिटीश डिझायनर सर जोनाथन इव्ह याने मात्र टिव्ही निर्मितीचा प्रकल्प सुरू झाला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून अॅपलसाठी टिव्ही हे महत्त्वाचे उत्पादन असल्याचेही सांगितले आहे.या टिव्हीला व्हॉईस कंट्रोलर उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे सांगून जोनाथन म्हणाले की अॅपलचे सर्वेसर्वा स्टीव्ह जॉब्ज यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या चरित्रलेखकाला त्याबाबत सांगितले होते. अनेक तंत्रज्ञानापैकी कोणते तंत्रज्ञान अधिक आवडेल या प्रश्नाला उत्तर देताना स्टीव्हने आपल्याला टिव्ही तंत्रज्ञान बनवायला आवडेल असे उत्तर दिले होते.

हा टिव्ही कदाचित २०१३ च्या सुरवातीलाही बाजारात येण्याची शक्यता असून तो ४२ आणि ५५ इंच स्क्रीनसह उपलब्ध होऊ शकणार आहे. त्याची किंमत साधारण १५०० ते २००० डॉलर्स दरम्यान असेल आणि जागतिक बाजारात तीन वर्षात तो १० टक्के बाजार काबीज करेल असेही अंदाज वर्तविण्यात आले आहेत.

Leave a Comment