अभिनव चौकशी समितीचा अहवाल शिक्षण मंत्रालयाकडे सादर

अभिनव कला महाविद्यालय बंद करण्यासाठी संस्थेकडून जी कारणे दिली जात आहेत, ती ठोस नाहीत. तसेच संस्थेतील कोणत्याही एका व्यक्तीला महाविद्यालय बंद करण्याचा अधिकारच नाही, असा स्पष्ट उल्लेख अभिनव महाविद्यालयाच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालात करण्यात आला आहे. कला संचालनालयातर्फे उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडे हा अहवाल पाठवण्यात आला.

शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी नियुक्त केलेल्या प्रा. जी. जी. वाघमारे, प्रा. दिलीप बोरले, प्रा. अरुण दारोकर यांची चौकशी समितीने हा अहवाल सादर केला आहे. आजी-माजी विद्यार्थी, पालक, कला प्रेमी, कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी यांच्याशी चर्चाकरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

कला संचालक जी. बी. धानोरकार म्हणाले, अभिनव कला महाविद्यालय बंद करून विद्यार्थ्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे. तसेच महाविद्यालय बंद करण्यासाठी संस्थेकडून कोणतेही ठोस कारण देण्यात आलेले नाही. शासनाला जी कारणे कळवण्यात आली आहेत ती संपूर्णपणे संस्थेच्या अंतर्गत कामकाजाशी निगडीत आहेत. यावरून संस्थेच्या कोणत्याही एका व्यक्तीने महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेणे बेकायदेशीर आहे. संस्थेवरील अशा वादग्रस्त व्यक्तींला हटवण्यात यावे, असे चौकशी समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment