
कैरो दि.१- तब्बल ३१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इजिप्तमधील आणीबाणी कायदा अखेर रद्द करण्यात आला असून त्यामुळे या कायद्याविरोधात लढणार्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
कैरो दि.१- तब्बल ३१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इजिप्तमधील आणीबाणी कायदा अखेर रद्द करण्यात आला असून त्यामुळे या कायद्याविरोधात लढणार्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
इजिप्तचे माजी अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या झाल्यानंतर १९८१ पासून हा कायदा अस्तित्वात आला होता. या कायद्याने सुरक्षा दलांचे सबलीकरण करण्यात आले होते. त्यामुळे पोलिस कोणाही नागरिकाला कोणतेही कारण न देता, कितीही काळापर्यंत तुरूंगात डांबून ठेवू शकत होते. न केलेल्या गुन्ह्यांबद्दल जबरदस्तीने कबुलीजबाब घेतले जात होते व तुरूंगवासाची शिक्षा दिली जात होती. अनेक जणांना तुरूंगातून मुक्त करण्याचे न्यायालयाचे आदेशही धाब्यावर बसविले जात होते असे समजते.
होन्सी मुबारक यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर तर १० हजारांहून अधिक नागरिकांना तुरूंगात डांबले गेले होते व त्यातील कित्येकजणांना तेथेच मृत्यू आला. मुबारक यांची सत्ता गतवर्षी गेल्यानंतर लष्कराने सत्ता हाती घेतली आहे. मुबारक यांच्या विरोधातही हा कायदा रद्द व्हावा यासाठीच प्रामुख्याने सतत निदर्शने केली जात होती व त्याचाच परिणाम उठाव होण्यात झाला होता. मुबारक यांनी हा कायदा बदलण्यास नकार दिला होता. लष्कराने सत्ता हाती घेतल्यावरही अनेक निरपराध नागरिकांवर अत्याचार केले गेले असून गुन्हेगार, दहशतवादी, अमली पदार्थ तस्कर यांच्यावर जरब बसावी म्हणून केलेला हा कायदा सरळ राजकीय विरोधकांच्या विरोधातच वापरला जात होता. आता मात्र लोकशाही पद्धतीने निवडणूका झाल्यामुळे नवीन सरकार सत्तेवर येईल त्यावेळी म्हणजे जूनअखेरी त्यांच्या हातात सत्ता दिली जाईल असे लष्कराने जाहीर केले आहे.