महाराष्ट्रात बंदला अनेक शहरांत हिंसेचे गालबोट

मुंबई दि.३१- वाढती महागाई आणि पेट्रोलदरवाढी विरोधात एकत्र येऊन विरोधी पक्षांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंदला देशात संमिश्र प्रतिसाद मिळाला असतानाच महाराष्ट्रात मात्र अनेक ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागले. मुंबई, पुणे, ठाणे ,नागपूर अशा अनेक शहरांत बसची तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडल्या.

महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी भाजप, रालोअसह सर्वच विरोधी पक्षांनी ३१ मे रोजी भारत बंदची हाक दिली होती. महाराष्ट्रात भाजप, शिवसेनेने बंद मध्ये सहभाग घेतला असला तरी मनसे या बंदपासून दूर राहिली होती. रात्री १२ पासूनच भाजपचे कार्यकर्ते आक्रमक बनले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी बंद काळात शांतता पाळण्याचे आवाहन केले होते मात्र पुण्यात सकाळपर्यंतच १५ बसेसची तोडफोड आणि अनेक ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले. मुंबईत दुपारी बारापर्यंत ४३ बसेसची तोडफोड करण्यात आली होती. नागपूरमध्ये १० बस फोडण्यात आल्या. त्यात बसचालकाला कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत त्याचा हात मोडला. ठाण्यातही १ बस फोडण्यात आली व अन्य बसेसवर दगडफेक करण्यात आली.

मुंबईच्या पश्चिम उपनगरांत म्हणजे बोरीवली, कांदीवली स्टेशनवर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मुंबईत आजचा बंद हाताळण्यासाठी ४८ हजार पोलिस रस्त्यांवर तैनात करण्यात आले असून राखीव दलाच्या तीन तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पोलिस सीसीटिव्ही वरूनही परिस्थिती न्याहाळत आहेत. आजच्या बंदमध्ये शिवसेना सामील असली तरी सेना नेते उद्धव ठाकरे कुठेही दिसले नाहीत असे समजते.

महाराष्ट्रात नवी मुंबई, कोकण, सांगली, गोंदिया,चंद्रपूर भागातही बंदचा चांगला परिणाम जाणवला. देशात जेथे जेथे बिगर काँग्रेस सरकारे आहेत त्या राज्यांत बंदचा जोर अधिक होता तर काँग्रेसची सरकारे असलेल्या राज्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असल्याचे वृत्त आहे.

Leave a Comment