जम्मू काश्मीर कॅबिनेटची एलओसीवर बैठक

श्रीनगर दि.३१- जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्री तंगधर येथील गेस्ट हाऊसच्या मांडवात पोहोचले आणि जम्मू काश्मीरचा जणू नवा इतिहासच लिहिला गेला. त्यामागचे कारण असे की या राज्याच्या इतिहासात प्रथमच जम्मू आणि श्रीनगर या राजधान्यांच्या बाहेर आणि तीही लाईन ऑफ कंट्रोलवर राज्याच्या मंत्रीमंडळाची बैठक घेण्यात आली.

याविषयी मिळालेली सविस्तर माहिती अशी की बुधवारी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि त्यांचे सहकारी मंत्री तंगधरचे आमदार खफील उल रहमान यांच्या मुलाच्या विवाहासाठी तंगधर येथे पोहोचले. त्यानंतर दुसरे दिवशी त्यांनी तिहवाल या भारतीय हद्दीच्या शेवटी असलेल्या खेड्याला भेट दिली. संपूर्ण चिखलाचा रस्ता पार करून ते येथे आले तेव्हा येथील ग्रामस्थांनी त्यांना आपल्या वेदना सांगितल्या. येथे केवळ एका नदी पात्राने भारत आणि पाकिस्तान सीमारेषा आखली आहे. रस्त्यांची दुरावस्था, मोबाईल फोनची सुविधा नाहीच पण बेरोजगारीही प्रचंड असलेल्या या भागाच्या अडचणी मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी समजून घेतल्या आणि सीमाभागातील खेड्यांसाठी दोन कोटी रूपयांची मदत जाहीर केली. सायंकाळी पुन्हा तंगधरला परतल्यावर तेथेच मंत्रीमंडळ बैठक पार पडली.

ग्रामविकास मंत्री अली मोहम्मद सगर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी या बैठकीने प्रशासनच सीमावर्ती भागातील नागरिकांच्या दारी नेले. गेली अनेक वर्षे येथे होत असलेल्या फायरिंग आणि तोफगोळ्यांच्या वर्षांवाच्या खुणा आजही शाबूत आहेतच पण याच कारणाने या भागापासून राजकारणीही कायम दूर राहिले आहेत. सीझ फायर झाल्यापासून हा धोका थोडा कमी झाला असला तरी या भागात युद्धभूमीचे वातावरण कायमच आहे. मुख्यमंत्र्यांनी या भागातील जनतेला शांतता आणि सुव्यवस्था व सुबत्ता आणण्याचे वचन यावेळी दिले.

Leave a Comment