आनंदने विश्‍वविजेतेपद पटकाविले

मॉस्को, दि. ३१ – भारताच्या विश्‍वनाथन् आनंदने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या टायब्रेकर फेरीत अप्रतिम खेळ करीत सलग चौथ्यांदा विश्‍वविजेतेपद पटकाविले आहे. इस्त्राएलच्या बोरिस गेलफंडचा २.५ – १.५ अशा गुणसंख्येने पराभव करून आनंदने जागतिक बुद्धिबळ विश्‍वातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आनंदच्या या विजयामुळे संपूर्ण देशभरातून हर्ष व्यक्त केला जात आहे.

२००७ साली झालेल्या विश्‍वविजेतेपद स्पर्धेत आनंदने रशियाचा व्लादिमीर क्रामनिक आणि इस्त्राएलच्या बोरिस गेलफंडला धूळ चारीत विजेतेपद पटकाविले होते. या आधी त्याने २००० साली तेहरान येथे फिडेने आयोजित केलेल्या विश्‍वविजेते पदाच्या स्पर्धेत त्याने रशियाच्या ऍलेक्सी शिरॉवचा पराभव केला होता. मात्र त्यावेळी बुद्धिबळ विश्‍वातील दोन शिखर संस्थांमध्ये असलेल्या वादामुळे हे विजेतेपद सर्वमान्य नव्हते. त्यामुळे २००७ सालच्या त्याच्या विजयाचे मोल अधिक होते. त्यानंतर २००८ साली आनंदने पुन्हा एकदा क्रामनिकचा पराभव करून आपला दर्जा सिद्ध केला. २०१० साली बल्गेरियाच्या व्हॅसिलिन टोपालोवला नमवून आनंदने आपला जेतेपदाचा किताब कायम राखला होता. त्यामुळे मॉस्को येथे सुरू असलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेकडे यंदा जगभरातील बुद्धिबळप्रेमींचे लक्ष लागले.

आनंद आणि गेलफंड यांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने स्पर्धेसाठी उत्तम तयारी केल्याचे पहिल्या काही लढतीतच स्पष्ट झाले. परिणामी यंदाच्या स्पर्धेतील पहिले सहा डाव अनिर्णित अवस्थेत राहिले. सातव्या डावात पांढर्‍या मोहर्‍यांनिशी खेळणार्‍या गेलफंडने आक्रमक खेळ करीत आनंदचा पराभव करून, स्पर्धेत सनसनाटी आघाडी घेतली. आनंदचा करिश्मा संपला की काय, असा प्रश्‍न पडलेल्या त्याच्या चाहत्यांना आनंदने स्पर्धेच्या आठव्या डावात निखळ विजयाची भेट दिली. या डावात पांढर्‍या मोहर्‍यांनिशी खेळणार्‍या आनंदने अवघ्या १७ चालींमध्ये गेलफंडची कोंडी करीत त्याला पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. त्यानंतर मात्र उर्वरीत चारही डावात दोन्ही खेळाडूंनी सावध खेळ करून बरोबरीच साधली. त्यामुळे बुधवारी ही स्पर्धा टायब्रेकर स्वरूपात खेळविण्यात आली.

या स्वरूपाच्या स्पर्धेत प्रत्येकी २५ मिनिटांचे चार डाव खेळविले जातात. ज्यात प्रत्येक चालीनंतर खेळाडूंना १० सेकंदांचा बोनस वेळ दिला जातो. या प्रकारात आनंद मातब्बर समजला जातो. त्याने बुधवारी आपला हा लौकिक सार्थ ठरविला. अतिशय तणावाखाली खेळणार्‍या गेलफंडने पहिल्या डावात गमाविलेल्या विजयाच्या संधीच त्याला महागात पडल्या. चार डावांपैकी दुसर्‍या डावात आनंदने ७७ चालींमध्ये गेलफंडचा पराभव केला. तर उर्वरीत तिन्ही डाव बरोबरीत सुटले.

Leave a Comment