अनोखी ऑडी ई-बाइक

लंडन दि.३१- सायकलला मोटरसायकलचा वेग असता तर? असा विचार तुमच्या मनांत येतोय कां ? मग थांबा ! आता ही केवळ कविकल्पना राहिली नसून ती प्रत्यक्षात उतरली आहे ऑडी ई-बाइकच्या रूपात. आणि त्यासाठी फार कांही करायलाही नको बरं का! केवळ एक बटण दाबलेत की तुमची सायकल चक्क ८० किलोमीटरचा वेग गाठू शकणार आहे.

ऑडी या जगप्रसिद्ध वाहनकंपनीने मोटर रेसिंग डिझायनिंग नुसार या सायकलचे डिझायनिंग केले आहे. फॉर्म्युला वन साठी गाडीला आवश्यक असलेली जवळजवळ सर्व उपकरणे या सायकलमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पायडलिंग करून पाय दमले की एक बटण दाबायचे. त्यानंतर इलेक्ट्रिक मोटर तुमच्या सायकलचा ताबा घेईल आणि अगदी ८० च्या स्पीडनेही तुमची सायकल धावू शकणार आहे. ही सायकल वापरणार्‍या सायकलस्वाराला पाच मोडस उपलब्ध करून देण्यात आले असून त्यातून एका मोडची तो निवड करू शकणार आहे. प्युअर मसल पॉवर मोड, इलेक्ट्रिक मोटर मोड, पायडल मोड, ईग्रीप असे त्यांचे स्वरूप आहे.

या सायकलला संगणकासह जोडलेला स्मार्टफोन असून त्याचा वापर करून केवळ व्हिडीओ शूटिंग करणेच नाही तर ते लगेच इंटरनेटवर अपलोड करणेही शक्य आहे असे या सायकलच्या डिझाईन टीममधले हेंड्रीक शेफर्स यांचे म्हणणे आहे. सायकलला स्वदेशी बनावटीचा एइडी ऑडी लाईटही देण्यात आला आहे. या सायकलची किंमत मात्र जाहीर करण्यात आलेली नाही.

Leave a Comment