टोयोटोने भारतीय बाजारपेठेला केले लक्ष्य

पुणे दि.३१- जपानी वाहन उद्योगातील बलाढ्य कंपनी टोयोटोने छोट्या श्रेणीतील मोटरकारची निर्मिती वाढविण्यावर भर दिला असून त्यांच्या विक्रीसाठी भारताची बाजारपेठ हे मुख्य लक्ष्य केले आहे. टोयोटो जागतिक धोरणाखाली सध्या सहा कॉम्पॅक्ट कार्सची मॉडेल विकसित करत असून ती येत्या चार वर्षात बाजारात आणली जाणार आहेत. टोयोटो किलोस्करचे व्यवस्थापकीय संचालक हिरोशी नाकागावा या संदर्भात माहिती देताना म्हणाले की २०१५ पर्यंत आठ कॉम्पॅक्ट मोटर कारची मॉडेल आम्ही बाजारात आणणार असून सध्या दोन बाजारात आली आहेत. भारत ही आमच्यासाठी सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने या गाड्यांची विक्री येथे कशी वाढवायची याचाही अभ्यास केला जात आहे.

कंपनीच्या सध्या उपलब्ध असलेल्या सर्व गाड्यांच्या किमतीत एक दोन दिवसांत १ ते २ टक्के वाढ करण्यात येणार आहे.रूपयाचे होत असलेले अवमूल्यन त्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत आहे. अवमूल्यनामुळे कंपन्यांवर मोठा दबाव असून या वर्षात कंपनी त्यांची कारविक्री १ लाख ८०हजार युनिटवर नेण्याचा प्रयत्न करत आहे असे उपव्यवस्थापकीय संचालक (मार्केटिंग) संदीप सिंग यांनी सांगितले.

टोयोटोची प्रमुख प्रतिस्पर्धी मारूती सुझुकीची सहा मॉडेल्स सध्या बाजारात असून त्यांची अल्टो ही बेस्ट सेलिंग कार ठरली आहे.त्यांच्या वॅगन आर, स्विफ्ट, एस्थिलो या गाड्याही चांगल्या खपत असून भारतातील बाजारपेठेत त्यांचा हिस्सा तब्बल ४६ टक्के आहे. टोयोटोच्या प्रमुखांच्या मते युरोप अमेरिकेत कंपनीच्या वाढीला संधी कमी आहे म्हणून त्यांनी त्यांचे लक्ष भारताबरोबरच ब्राझील, रशिया, चीन, आशियाई देश, इंडोनेशिया यांच्यावर केंद्रीत केले असून जागतिक बाजारात आपला वाटा ४० टक्कयांवर नेण्याचे ध्येय ठेवले आहे. येत्या चार वर्षात हा वाटा १० टक्यांनी वाढविण्यासाठी कसून प्रयत्न केले जाणार आहेत. कंपनीने त्यांच्या भारतातील प्रकल्पात मार्चमध्ये ३०० कोटी तर जुलै११ मध्ये ८९८ कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे.

Leave a Comment