आंध्रातील चिमुकले खेडे तंबाखूमुक्त गांव

नवी दिल्ली दि.३१- आज पंचविसावा जागतिक तंबाखूविरोधी दिन जगभर साजरा होत असताना आंध्राच्या पोंगालिपक या चिमुकल्या खेड्याने गांव तंबाखूमुक्त झाल्याची शपथ घेतली आहे. १६३२ इतक्याच लोकसंख्येचे हे गांव २००७ साली निर्मल ग्राम पुरस्काराचेही मानकरी ठरले होते. या गावाला तंबाखूमुक्त करण्यासाठी गावचे सरपंच, ग्रामस्थ यांना पब्लिक हेल्थ फौंडेशन ऑफ इंडिया आणि नेचर यांचेही सहकार्य मिळाले.

सरपंच यु देमुडू सत्यनारायण याविषयी माहिती देताना सांगतात आम्ही गेल्या वर्षीच्या १५ ऑगस्टपासूनच या अभियानाचा मुहूर्त केला होता. ग्रामस्थांनी तंबाखू, सिगरेट व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहावे यासाठी सतत जनजागरण करण्यात येत होते. नोव्हेंबरमध्ये आम्ही गावातली या पदार्थांची विक्री करणारी सर्व दुकाने बंद करण्यात यश मिळविले व या दुकानदारांनीही अन्य व्यवसाय सुरू केले. आज जागतिक तंबाखू विरोध दिनी आम्ही पूर्ण तंबाखूमुक्त झालो आहोत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या टोबॅको फ्री विभागाचे संचालक डग्लस बेच्चर सांगतात प्रत्येक वर्षी तंबाखू वा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने जगात ६० लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्यात गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांची संख्या जास्त आहे.

Leave a Comment