स्त्री भ्रूण हत्या प्रकरणी डॉ. मुंडे यांना लवकरच अटक – गृहमंत्री

पुणे, दि. ३० – अवैध गर्भपात करून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी परळीचे डॉ. सुदाम मुंडे यांना कोणत्याही दबावाला बळी न पडता अटक केली जाईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यनी मंगळवारी स्पष्ट केले.

डॉ. मुंडे यांच्यासंदर्भात पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, मुंडे यांच्यावर गंभीर आरोप आहेत. माणुसकीला काळीमा फासणारे त्यांचे कृत्य आहे. त्यामुळे याबाबत पोलिसांची भूमिका कठोर अशीच राहील. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. यासंदर्भात अधिक माहिती देता येणार नाही. मात्र, मुंडे यांना लवकरच अटक केली जाईल. पळून-पळून ते पळणार कुठे ? पोलीस त्यांना पकडतीलच.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांवर केलेल्या टिकेकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी परस्परपूरक भूमिका घेतली होती. अमरावतीत काँग्रेस पक्षाच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्याने बंडखोरी केली. चंद्रपूरमध्येही तेच घडले. मात्र, राष्ट्रवादीने पूर्ण सहकार्य केले. आमचे धोरण एकमेकांना मदत करण्याचेच राहिले आहे आणि यापुढेही राहील, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.

दुष्काळासंदर्भात पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत मात्र माहिती घेतल्यावर बोलू असे उत्तर त्यांनी दिले.

Leave a Comment