‘भारत बंद’मध्ये कामगार संघटनांचा सहभाग नाही – शरद राव

मुंबई, दि. २९ – केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल दरवाढीच्या विरोधात भाजपास एनडीएमधील राजकीय पक्षांनी ३१ मे रोजी पुकारलेल्या ‘भारत बंद’मध्ये हिंद मजदूर सभेशी संलग्नित असलेल्या विविध कामगार संघटना सहभागी होणार नाहीत. कारण भाजपाने सत्तेचे स्वप्न साकारण्यासाठी सत्ता बदलासाठी पुकारलेला राजकीय बंद आहे, अशी माहिती हिंदू मजदूर सभेचे कामगार नेते शरद राव यांनी दिली.

शरद राव मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ऍड. महाबळ शेट्टी, शशांक राव आदी मान्यवर आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल दरवाढीला आमच्या कामगार संघटनांचाही विरोध आहे. मात्र, एनडीएने पुकारलेला बंद हा राजकीय असल्याने या बंदमध्ये रेल्वे, गोदी, हवाई वाहतूक, एसटी, बेस्ट, रिक्षा-टॅक्सी, नागरी सेवेतील आणि औद्योगिक कर्मचारी फेरीवाले आदी हिंद मजदूर सभेशी संलग्नित दोन कोटी कामगार संपात सहभागी होणार नाही, असे राव यांनी सांगितले.

सरकारने वॅट कर, सरचार्ज रद्द करावा
पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी, केरोसिन यांचे दर एकसमान करण्याचे सरकारचे कारस्थान असून त्याचे भयंकर परिणाम होतील. केवळ जीवनावश्यक वस्तूंच्यात नव्हे तर शिक्षण, आरोग्य, कपडालत्ता अशा मूलभूत गरजांच्या भाववाढीला सरकारी धोरणाविरोधात प्रदीर्घ लढा कामगारांतर्फे दिला जाणार आहे.

पेट्रोल दरवाढी विरोधात मोर्चे, धरणे आंदोलन
केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल दरवाढीविरोधात हिंद मजदूर सभेतर्फे संलग्नित सर्व संघटनांचे कामगार मेळावे, मोर्चे, धरणे आंदोलनाच्या माध्यमातून प्रदीर्घ लढा देणार आहे. मुंबई शहर, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर व ठाणे या चार ठिकाणी कामगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत, असे राव यांनी सांगितले.

सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अत्यावश्यक किंमतीमध्ये वॅट कर रद्द करावा, पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅस असा इंधनावरील सरचार्ज तात्काळ रद्द करावा, अशी मागणी राव यांनी केली आहे.

Leave a Comment