नवी दिल्ली दि.३०- कोरियन जायंट स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने मंगळवारी त्यांच्या गॅलॅक्सी एस थ्री स्मार्टफोन युरोपच्या बाजारपेठेत उपलब्ध केला असून गुरूवारी हा फोन भारतीय बाजारातही येत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा स्मार्टफोन बाजारात आणून सॅमसंगने अॅपलवर विक्रीबाबत मात केली असल्याचे बाजारातील जाणकार सांगत आहेत. जगभरातून या फोनसाठी ९० लाख ऑर्डर आल्या असून बाजारात प्रत्यक्ष येण्यापूर्वी आजपर्यंत कोणत्याच नॉन अॅपल उपकरणांना इतक्या प्रचंड संख्येने मागणी आलेली नाही. अॅपलच्या आयफोनने ४० लाख ग्राहक पहिल्या खेपेत मिळविले होते.
कोरियन कंपनी सॅमसंगने स्मार्टफोन बाजारात अॅपलशी दोन हात करण्यासाठी सर्व सिद्धता केली असून एप्रिलमध्येच त्यांनी जगातील सर्वाधिक स्मार्टफोन उत्पादक म्हणून पहिले स्थान मिळविले आहेच आता सर्वाधिक ग्राहक मिळविणारी कंपनी हाही सन्मान त्यांना हवा असून त्यादृष्टीने त्यांनी अनेक योजना हाती घेतल्या आहेत. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गॅलॅक्सी एस थ्रीने अॅपल उपकरणांना नक्कीच मागे सारले असून एस थ्री मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला स्क्रीन तुम्ही जितका वेळ त्याच्याकडे पाहाल तोपर्यंत दिसत राहणार आहेच पण वायरलेस चार्जिंग, एचडी व्हीडिओ, अन्य वापर करतानाही उपलब्ध होऊ शकणारा छोटा स्क्रीन, कानाशी फोन नेताच ऑटो कॉलिंग अशी अनेक वैशिष्ठे या फोनमध्ये असून त्यामुळे तो जादा आकर्षक बनला आहे.
सीएनइटीने तर याचे वर्णन ‘अँडॉईड फोनमधील फेरारी ‘ असे केले असून हा स्मार्टफोन म्हणजे फुल फ्लेज्ड संगणकच असल्याचे मत दिले आहे. कंपनीने फोनची किंमत अजून जाहीर केलेली नसून ती ३६ ते ३८ हजार रूपयांच्या दरम्यान असेल असे सांगितले जात आहे.