रेड्डींची अटक

आंध्र प्रदेशात काल दोन निर्णय खळबळजनक ठरले. केन्द्र सरकारने अल्पसंख्यकांसाठी ठेवलेले  ४.५ टक्के आरक्षण आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने अवैध ठरवून रद्द केले तर वाय.एस.आर. काँग्रेसचे नेते  खासदार जगनमोहन रेड्डी यांना अटक झाली. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून जिच्याकडे पाहिले जात आहे त्या विधानसभेच्या १८ जागांची पोट निवडणूक ऐन तोंडावर असतानाच निवडणुकीच्या मतदानावर प्रभाव टाकणार्‍या या दोन घटना घडल्या. जगन मोहन रेड्डी यांना  अवैध संपत्ती अर्जित करण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने ११ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. आंध्र प्रदेशातली पोटनिवडणूक १२ जूनला होईल आणि तोपर्यंत जगन मोहन रेड्डी याला न्यायालयीन कोठडीत रहावे लागेल. त्याची सारी प्रतिष्ठा पणाला लावणारी ही निवडणूक होत असतानाच तो न्यायालयीन कोठडीत बंद आहे आणि त्याच्याशिवाय त्याच्या पक्षाचा प्रचार होत आहे. मतदानाची तारीख १२ आणि कोठडीची मुदत ११ जून याचा कोणीही उघडपणे असा अर्थ काढू शकतो की, या निवडणुका होईपर्यंत जगन मोहन रेड्डी यांनी कोठडीत रहावे आणि काँग्रेसला या पोटनिवडणुका जिकणे सोपे जावे हाच या अटकेमागचा हेतू आहे.

अर्थात काँग्रेसचे नेते हा आरोप नाकारतीलच. अटक सीबीआयने केलेली आहे आणि कोठडी न्यायालयाने दिलेली आहे. तिच्याशी काँग्रेसचा काही संबंध नाही, असा खुलासा काँग्रेस नेते करतीलच. त्यांनी कितीही खुलासे केले तरी नेमके ११ तारखेपर्यंतच जगन मोहन रेड्डीला कोठडीत ठेवले जाते ही गोष्ट काही आपोआप घडलेली नाही. त्याचा हेतू काहीही असो, या अटके मागे  काँग्रेसचा हात असो की नसो पण ११ तारखेपर्यंतच्या या कोठडीने नकळतपणे का होईना पण जगन मोहन रेड्डीचे अटक आणि पोटनिवडणुकांचे राजकारण यांचा मेळ आपोआप घातला गेला आहे. जगन मोहन रेड्डी हा माणूस काँग्रेसला महाग पडणारा आहे आणि तो पडलेलाही आहे. त्याच्या मागे त्याचे वडील डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी यांची पुण्याई आहे. त्यांना मानणारे अनेक नेते राज्यात आमदार आहेत.  २००९ साली तिथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राजशेखर रेड्डी यांना उमेदवार निवडण्याबाबत पूर्ण अधिकार दिले होते. त्याचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या सांगण्यात आणि ऐकण्यात राहतील असे लोक उभे केले आणि  पैशाच्या जोरावर निवडूनही आणले. 

 असे १६ आमदार पक्ष सोडून जगन मोहनच्या पक्षात आलेले आहेत आणि त्यामुळेच या पोटनिवडणुका लागलेल्या आहेत. हे काँग्रेसचे १६ आमदार जगन मोहनच्या प्रभावाखाली आहेत आणि जनता आज जगन मोहनच्या मागे उभी राहण्याच्या मनःस्थितीत आहे. त्यामुळे या सोळाही जागा कदाचित जगन मोहन याच्या पक्षाला मिळतील, अशी शक्यता आहे. तसे झाल्यास आंध्रातली काँग्रेस संपल्यात जमा आहे, अशी भावना जनतेत निर्माण होऊ शकते आणि ती काँग्रेसच्या भवितव्याच्या दृष्टीने फारच घातक ठरणारी आहे. म्हणून निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत जगन मोहन तुरुंगात असलेला बरा, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटतच असणार. असे असले तरी अटक करण्याचे असे डावपेच नेहमी अटक करणार्‍याच्या फायद्याचेच असतात असे नाही. अटकेचे बुमरँग कधी कधी सरकारवर सुद्धा उलटत असते. अण्णा हजारे यांचे आंदोलन दडपण्यासाठी म्हणून सरकारने त्यांना अटक केली होती, परंतु ही अटक उलट सरकारची फजिती करणारीच कशी ठरली हे आपण गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये पाहिलेच आहे. अण्णा हजारेंना तिहारच्या तुरुंगात डांबले की त्यांचे आंदोलन संपून जाईल, अशी सरकारची कल्पना होती. म्हणून सरकारने त्यांना अटक केली होती. परंतु अटक केलेले अण्णा बाहेर असलेल्या अण्णांपेक्षा अधिक स्फोटक आहेत हे सरकारच्या लक्षात आले. अटकेचे बूमरँग सरकारवर उलटले.

आता जगन मोहन रेड्डीला अटक केली की, या सोळाही जागांवर त्याच्या पक्षाचा प्रचार क्षीण होईल, अशी सरकारची कल्पना असावी. मात्र अण्णा हजारेंप्रमाणेच जगन मोहन रेड्डीचीही परिस्थिती होणार आहे आणि बाहेर राहून प्रचार करणार्‍या जगनपेक्षा कारागृहातला जगन काँग्रेसला जास्त महागात पडणार आहे. त्याला पैशाच्या अफरातफरीबद्दल अटक केलेली आहे ही गोष्ट खरी आहे. तिच्यामुळे लोकांच्या मनात त्याच्याविषयी तिरस्कार निर्माण व्हायला पाहिजे. परंतु का कोण जाणे पण एवढा भ्रष्टाचार करून सुद्धा जगन मोहन रेड्डीची लोकप्रियता टिकून आहे आणि त्यामुळेच त्याच्या अटकेमुळे लोकांच्या मनात त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण होणार आहे आणि ही सहानुभूतीच त्याला सोळाही जागा मिळवून देण्यास कारणीभूत ठरू शकते. काय होईल हे नेमके आज सांगता येत नाही. मात्र सरकारच्या अशा कारवाया सरकारवर अनेकदा उलटलेल्या आहेत. जगन मोहनची अटक काँग्रेसला नेमकी किती महागात पडते किवा फायद्यात पडते हे १५ जूनलाच कळणार आहे.  

 

Leave a Comment