अण्णा हजारे यांनी सावरकरांचा मार्ग स्वीकारावा – शरद पोंक्षे

नागपूर, दि. २९ – रक्तपाताविना क्रांती शक्य नसून देशाच्या संरक्षणासाठी अहिंसा कुचकामी ठरते, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्पष्ट मत होते. त्यामुळेच १९३७ साली इंग्रजांच्या कैदेतून मुक्त झाल्यावर त्यांनी गांधींच्या हिंदी राष्ट्र आणि अहिंसा या दोन्ही संकल्पना नाकारल्या. अहिंसा ही कुठल्याही काळात प्रभावी होऊच शकत नाही. अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या अहिंसात्मक मार्गाची राज्यकर्ते गळचेपी करीत आहेत. जर अण्णा हजारे यांनी सावरकरांचा मार्ग स्वीकारला तर त्यांना हमखास यश मिळेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कलावंत शरद पोंक्षे यांनी केले.

स्थानिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित सावरकरांच्या १३० व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. ते म्हणाले की, सावरकर हे द्रष्टे राजकारणी होते. त्यांच्या कथनातील सत्य आम्हाला भविष्यात समजते. सावरकरांनी कैदेतून सुटल्यावर कॉंग्रेसचा मार्ग पत्करण्याऐवजी हिंदू महासभेला आपलेसे केले. महासभेच्या कर्णावती येथे १९३७ साली झालेल्या अधिवेशनात सावरकरांनी गांधींच्या हिंदी राष्ट्रवादाला विरोध दर्शवला होता. तात्यारावांच्या त्या कथनाचा प्रत्यय दहा वर्षांनी १९४७ साली पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर आला. दक्षिण आफ्रिकेत काळा-गोरा अशा संघर्षात अपयशी झालेल्या गांधींनी देशातील सर्व धर्माच्या लोकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी तत्कालीन लोकसंख्येत केवळ १० टक्के असलेल्या मुस्लिमांचे लांगुलचालन सुरु केले. मुस्लिम समाज दार ऊल हर्ब आणि दार ऊल इस्लाम अशा दोनच संकल्पनांवर विश्‍वास ठेवत असल्याचे मत सावरकरांनी अभ्यासांती बनवले होते. त्यामुळे स्वातंत्र्य आंदोलनात मुस्लिमांच्या सक्रीय सहभागाबद्दल ते सदैव साशंक राहिले. पण, गांधींनी मात्र या सत्याकडे पाठ फिरवून मुस्लिमांचे लांगुलचालन केले त्यामुळेच देशाची फाळणी झाल्याचे शरद पोंक्षे म्हणाले.

Leave a Comment