प्रेक्षक ठरवतात विजेते – सुनिधी

बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपटांमधील आपल्या प्लेबॅक सिंगिंगमुळे सर्वांचीच मने जिंकणारी सुनिधी चौहान पुन्हा एकदा नवोदित गायकांमधील प्रतिभेची पारख करताना दिसणार आहे. इंडियन आयडॉलच्या सहाव्या सिझनमध्ये ती अनू मलिक आणि सलीम मर्चंटसोबत जज म्हणून असणार आहे. या शोबद्दल खूपच उत्साही असल्याचे सुनिधीने म्हटले आहे. या सिझनमध्ये अतिशय टॅलेंटेड गायक मिळाले आहेत. त्यांच्यामध्ये एक प्रोफेशनल सिंगर बनण्याची क्षमता असल्याचे ती म्हणते. हा शो मागील शोप्रमाणेच असेल; पण यावेळी शोचा दर्जा उंचावल्याचे जाणवेल.

पूर्वीपेक्षा अधिक जास्त तयारीने गायक यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे स्पर्धाही अटीतटीची असेल, असे सुनिधी म्हणते. ज्या गायक, गायिकेचा आवाज आणि ज्याचे गाणे मनाला भिडेल तोच चांगला गायक असेल. शिवाय एका गायकाने वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायला हवीत, असे तिला वाटते. अशाच प्रकारच्या एका स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सुनिधीचे म्हणणे आहे की, तेव्हाच्या स्पर्धा आणि आताच्या स्पर्धांमध्ये बरेच अंतर आहे. पूर्वी विजेत्यांची निवड परीक्षक करीत असत; पण आता ती जबाबदारी प्रेक्षकांची आहे.

Leave a Comment