चालू खात्यातील तूट कमी होण्याची शक्यता

मुंबई, दि. २९ – गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या आयातीमध्ये घट झाली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीही कमी होत असल्याने अल्पमुदतीत चालू खात्यातील तूट कमी होण्यास फायदा होणार आहे. सोन्याच्या भरमसाट आयातीने गेल्या आर्थिक वर्षात चालू खात्यातील तूट वाढली होती. तसेच व्यापारी तुटीलाही फटका बसला होता. २०११-१२ या वर्षात चालू खात्यातील तूट चार टक्के होती. तर त्या आधीच्या वर्षामध्ये ही तूट केवळ अडीच टक्के होती. मात्र यंदा पहिल्या दोन महिन्यांमध्ये सोने आयात चांगली रोडावली आहे. तसेच देशात सर्वाधिक आयात करण्यात येणार्‍या कच्च्या तेलाच्या किमतीही आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० डॉलरपर्यंत कमी झाल्या आहेत. ज्यामुळे अल्पमुदतीत चालू खात्याची स्थिती सुधारण्यास मदत होईल. असे कोटक महिन्द्रा बँकेचे कार्यकारी अध्यक्ष उदय कोटक यांनी सांगितले.

सोने आयात व कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमती यामुळे फायदा होईलच, पण त्याचबरोबर सरकारने वाढणार्‍या व्यापारी तुटीला आवर घालण्यासाठी आणखी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे कोटक यांनी म्हटले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता व थंडावलेली गुंतवणूक पाहता चालू खात्याची तूट भरून काढणे सरकारला कठीण जात आहे. रूपयाच्या अवमूल्यनाने सरकारची डोकेदुखी वाढली असली तरी, रूपयाची घसरण ठराविक प्रकारातील गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरत आहे. तसेच यामुळे काही निर्यातदारांना याचा थेट फायदा झाला असून, आणखी निर्यातदारांनी याचा फायदा घेतला पाहिजे असेही ते म्हणाले. युरोपियन समुदायाच्या भवितव्याबाबत कोटक यांनी, ग्रीसची या युरोपियन समुदायातून गच्छंतीची शक्यता कमी असल्याचे सांगितले.

Leave a Comment