कोरेच्छे ! लोढेच्छे ! जितेच्छे !

कोलकाता दि.२९- यंदाच्या आयपीएल स्पर्धेत अजिक्य ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा विजयोत्सव कोलकाता येथील ईडन गार्डनवर साजरा होत असून त्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार आहेत.

वानखेडे स्टेडियमवरील वादावादीनंतर कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरूख काल मध्यरात्री कोलकाताच्या सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला तेव्हा त्याच्या स्वागतासाठी हजारो लोक ताटकळत उभे होते. शाहरूखनेही सर्वांना अभिवादन करून कोरेच्छे, लोढेच्छे, जितेच्छे ( केले, लढलो, जिकले ) असे ओरडून आपला आनंद व्यक्त केला. कोलकाताच्या नागरिकांचे ,बंगाली जनतेचे तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे संघाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याबद्दल तसेच दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल त्याने आभार मानले. विमानतळावर त्याचे व कोलकाता नाईट रायडर्सची सहमालक जुही चावला हिचे हार व पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले.

शाहरूखच्या आधीच्या विमानाने आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा तसेच कप्तान गौतम गंभीर याचाही बंगाली जनतेने असाच सन्मान केला. स्वागतासाठी आलेल्या जनतेने शाहरूख तसेच कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडूंचे मोठमोठे कटआऊटस आणले होते. बंगालच्या राज्यमंत्र्यांनी विमानतळावर ममता बॅनर्जी यांच्यातर्फे संघाचे तसेच शाहरूखचे स्वागत केले.

कोलकाता नाईट रायडर्सचा कप्तान गौतम गंभीर यानेही जनसमुदायाकडे पाहून ‘ आमी कोलकातार चेले ‘ (मी कोलकत्याचा मुलगा ) अशी घोषणा केल्यावर वातावरणात एकच जयघोष दुमदुमला.